'मोदी म्हणजे विषारी साप', खर्गेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक; म्हणाले, काँग्रेस खालच्या पातळीवर..

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं काँग्रेस अडचणीत सापडलीये.कलबुर्गी इथं निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी पीएम मोदींना विषारी साप  म्हटलंय. यानंतर भाजपनं त्यांना घेरलं असून त्यांच्यावर जोरदार टीका केलीये.मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (गुरुवार) कर्नाटकातील कलबुर्गी इथं उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, 'मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर नका समजू, परंतु ते चाखलं तर मरुन जाल.'

खर्गेंवर भाजप भडकला

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आता वादाला तोंड फुटलंय. खर्गे यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस अध्यक्षांवर ताशेरे ओढले आणि म्हटलं की, 'पक्ष दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'काँग्रेस अध्यक्ष खर्गे पंतप्रधान मोदींना 'विषारी साप' म्हणताहेत. सोनिया गांधींच्या 'मौत का सौदागर'पासून काय सुरू झालं आणि ते कसं संपलं, हे आपल्याला माहीत आहे. काँग्रेस सतत खालच्या पातळीवर जात आहे. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होणार हे त्यांना माहीत झालंय.'



'कर्नाटकचे लोक त्यांना धडा शिकवतील'

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, खर्गे यांच्याच मनात विष आहे. ते राजकीयदृष्ट्या आमच्याच्याशी लढू शकत नाहीत. कर्नाटकची जनता त्यांना धडा शिकवेल. त्याचवेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पीएम मोदींवरील वक्तव्यावर निशाणा साधत काँग्रेसनं देशाची माफी मागावी, अशी मागणी केलीये.

'खर्गेंनी देशाची माफी मागावी'

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष आहेत. त्यांना जगाला काय सांगायचं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. संपूर्ण जग त्यांचा आदर करतं. पंतप्रधानांसाठी अशी भाषा वापरणं काँग्रेस कोणत्या पातळीवर झुकली आहे हे दिसून येतं. त्यांनी (खर्गे) देशाची माफी मागावी, अशी आमची इच्छा आहे.

खर्गेंचं स्पष्टीकरण

मोदींवरील विधानानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, 'मी त्यांच्याबद्दल (पंतप्रधान मोदी) हे विधान केलं नाही. मी व्यक्तीगत वक्तव्य करीत नाही. त्यांची विचारधारा सापासारखी आहे, असं मला म्हणायचं होतं. जर तुम्ही विष चाखणार तर मृत्यू होणार, असं मला म्हणायचं होतं.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने