‘मेगा रिचार्ज’बाबत दोघा मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक

मुंबई: महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांचा महत्त्वाकांक्षी आंतरराज्य मेगा रिचार्ज प्रकल्प योजनेचा दोन्ही राज्यांद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून दोघा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी कामाचा आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशासाठी वरदान ठरणाऱ्या तापी परिसरातील मेगा रिचार्ज योजनेसंदर्भात ‘सकाळ’तर्फेही पाठपुरावा केला जात आहे.योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील पाणीवाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची मागील आठवड्यात भेट घेऊन केली आहे.



प्रकल्पाचा आढावा

त्या अन्वये या महत्त्वाकांक्षी योजनेचा डीपीआर व त्याच्या सद्य:स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता. १३) खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जळगावच्या तापी विकास महामंडळात भेट देऊन पुढील नियोजनाबाबत प्रमुख अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या दिल्ली येथील भेटीत लवकरच डीपीआरवर तपशीलवार आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्यांचा पाणीवाटपाबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार

ही बैठक लवकरात लवकर होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांना विनंती करणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी करणार आहे, अशी माहिती श्रीमती खडसे यांनी दिली.

मोदींच्या हस्ते भूमिपूजन

आधीच मेगा रिचार्ज प्रकल्पला वेळ झाला असून, या वर्षाच्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा घेण्यात येऊन, त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार खडसे यांनी दिली. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे, कार्यकारी अभियंता जी. एस. महाजन, कार्यकारी अभियंता यु. डी. दाभाडे, उपविभागीय अभियंता के. पी. पाटील व प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने