त्यांनी राहुल गांधी यांना देऊ केले अयोध्येच्या हनुमानगढीतील घर!

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे घर खाली करण्याचा निर्णय भाजपच्या चांगलाच अंगलट येत आहे. अखिल भारतीय संकटमोचन सेनेचे अध्यक्ष महंत संजयदास यांनी अयोध्येतील हनुमानगढी येथील दहाव्या शतकातील निवासस्थान राहुल गांधी यांना देऊ केले आहे. त्यांनी राहुल यांनी अयोध्येत येऊन या घरी राहावे, असे आवाहन केले. त्यामुळे हा साधू, संतांमध्ये देखील चर्चेचा विषय ठरला.श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील हे निवासस्थान दहाव्या शतकातील आहे. तेथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहावे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत श्रीराम मंदिर कार्ड खेळण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला हा धक्का आहे.

महंत संजयदास हे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष व देशभरातील साधूंमध्ये मोठे स्थान असलेले महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे या बातमीला देशाच्या राजकारणात मोठे स्थान आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात सुरत येथील कनिष्ठ स्तर न्यायालयाने कर्नाटक येथील वक्तव्याबाबत दोन वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने अत्यंत गतिमान कारवाई करीत त्यांची खासदारकी रद्द केली.त्यानंतर लगेचच त्यांचे दिल्लीतील निवासस्थान देखील खाली करण्यास सांगितले होते. त्याच्या देशभरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.



राहुल गांधी यांचे निवासस्थान काढून घेण्याच्या आदेशाचे प्रकरण भाजपच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र निर्माण झाले. अनेकांनी श्री. गांधी यांना आपले घर देऊ केले होते. मात्र आता थेट श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील हनुमानगढीतील दहाव्या शतकातील निवासस्थानी राहुल गांधी यांनी येऊन राहावे. त्यांचे स्वागत असेल, असे कळविले आहे.संजयदास हे हनुमानगढीचे पुजारी देखील आहेत. त्यांनी धर्मरक्षणासाठी अखिल भारतीय श्री. संकटमोचन सेना स्थापन केली आहे. या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. याबाबत त्यांनी ‘सरकारनामा’ ला सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांचे मनापासून स्वागत करतो.

त्यांना राहण्यासाठी येथील घर देखील देऊ. त्यांनी आमच्या प्रस्तावाचा जरूर विचार करावा. त्यांनी अयोध्येला यावे. येथील दौरा करावा. श्रीराम व हनुमानाची पूजा करून आर्शिवाद घ्यावेत. इथे अनेक आश्रम आहेत.त्यात देखील येऊ शकतात. तसे झाल्यास आम्हाला आनंदच होईल. आम्ही राजकारण व नेते यात कोणताच भेद करीत नाही. सर्व श्रीरामाचे भक्त असे आम्ही मानतो.महंत संजयदास यांच्या या वक्तव्याने देशाच्या राजकारणाला एक नवा विषय मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप श्रीराम मंदिराचा अजेंडा पुढे करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत थेट श्रीराम जन्मस्थान असलेल्या अयोध्येतून राहुल गांधी यांना साधूंकडून निमंत्रण दिले जात आहे. तो भाजपच्या राजकारणाला एक प्रकारे धक्काच मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने