सुदानमध्ये गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांसाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

नवी दिल्ली:  सुदानमध्ये अंतर्गत संघर्षामुळे तेथील नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. लष्कर आणि निमलष्करी दलांमधील या संघर्षात आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तेथील अस्थिर परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांनी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सुमारे ५०० भारतीय पोर्ट सुदानला पोहचले आहेत, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी केले.सुदानच्या गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांनी परत आणण्यासाठी हवाई दलाचे ‘सी-१३०’ प्रकारची दोन विमाने, नौदलाचे ‘आयएनएस सुमेधा’ जहाज सज्ज आहेत. नौदलाचे जहाज सौदीतील जेद्दाह येथे तैनात आहे तर ‘आयएनएस’ सुमेधा सुदानच्या बंदरात पोहोचले आहे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने दिली आहे.



परराष्ट्र मंत्री म्हणाले...

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की ‘सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. सुमारे ५०० भारतीय पोर्ट सुदानला पोहोचले आहेत. वाटेत आणखी काही भारतीय आहेत. त्यांना घरी परत आणण्यासाठी आपली जहाजे व विमाने तयार आहेत. सुदानमधील आपल्या सर्व बांधवांची सुटका करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.युद्घ सुरू असलेल्या ठिकाणी सुपर हरक्युलस लष्करी मालवाहू विमान तैनात करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक गेल्या शुक्रवारी (ता.२१) झाली होती. सुदानमधील भारतीयांच्या सुटकेसाठी आपत्कालीन योजना तयार करण्याचा आदेश मोदींनी अधिकाऱ्यांना दिला होता. भारताने याआधीही अफगाणिस्तानमधील बचावकार्यासाठी ‘सी१०३ जे’ या विमानाचा वापर केला होता. ‘सुदानमध्ये फसलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार सर्व प्रयत्न करीत आहे,’ अशी ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तेथील भारतीयांची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी विविध भागीदारांशी आम्ही समन्वयाने काम करीत आहोत. सुदानी अधिकाऱ्यांशिवाय भारत संयुक्त राष्ट्रे (यूएन) आणि सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त आणि अमेरिकेच्याही संपर्कात आहे, असेही मंत्रालयाने सांगितले.

बाहेरील देशांसाठी विमानतळ बंद

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सुदानमध्ये अडकलेल्या लोकांना हवाई आणि जल मार्ग असे दोन्‍ही पर्याय उपलब्ध केले आहेत. रस्ते वाहतूक सुरक्षित स्थितीवर अवलंबून आहे. सध्या हवाई दलाची ‘सी१३०जे’ ही दोन विमाने सौदीत तैनात आहेत तर ‘सुमेधा’ जहाज सुदानच्या बंदरात पोहोचले आहे. सुदानची हवाई हद्द सर्व परकीय विमानांसाठी बंद करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालय दक्ष

‘सुदानमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताचे लक्ष असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सुदानमधील भारतीय दूतावास तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या नियमित संपर्कात आहे. दूतावासातील लोकांना सुरक्षितपणे प्रवास करण्यास आणि धोक्यापासून सावध पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने