आणखी ६०० भारतीय मायदेशी; विनय क्वात्रा

 नवी दिल्ली : हिंसाग्रस्त सुदानमध्ये राहणाऱ्या तीन हजार ५०० भारतीयांपैकी सतराशे जणांनी देशाबाहेर आणले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरू असून सरकारचे त्यावर लक्ष असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी सांगितले. सहाशे नागरिक मायदेशी पोहोचले आहेत.पत्रकारांशी बोलताना क्वात्रा म्हणाले,‘‘सुदानमध्ये १५ एप्रिलपासून अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. तेव्हापासून सरकार सातत्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तेथे साधारण साडेतीन हजार भारतीय नागरिक व एक हजार भारतीय वंशाचे नागरिक असल्याचा अंदाज आहे. बचावकार्यातून ६०० भारतीय मायदेशी परतले आहेत.

सुदानमधील इतर देशांच्या नागरिकांनाही बाहेर काढण्याची विनंती आम्हाला करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रियेच्या पूर्ततेवर ते अवलंबून असेल.’’ सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित मार्गातून बाहेर काढणे हे आमचे उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.भारताने सुरू केलेल्या बचावकार्यात नौदलाच्‍या ‘आयएनएस सुमेधा’ आणि ‘आयएनएस तेग’ या दोन जहाजांबरोबरच ‘आयएनएस तारकश’ हे तिसरे जहाज पोर्ट सुदानला आज पोहोचले आहे. ‘आयएनएस तेग’मधून २९७ भारतीय जेद्दाहला पोहोचले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

सुदानची राजधानी खार्तुममध्ये काही जण अडकलेले आहेत व शहराबाहेर पडण्यास अडचणी येत असल्याने भारतीय नागरिकांनी तातडीने रस्ते मार्गाने पोर्ट सुदानला आणण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. तेथून ते लष्करी विमान आणि नौदलाच्या जहाजांमधून त्यांना सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आणले जात आहे.बुधवारी रात्री ३६० भारतीयांना विशेष विमानाने परत आणले असून अजून २४६ जण भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या मालवाहू विमानाने महाराष्ट्रात आले आहेत. अजून ४९५ भारतीय जेद्दाहत असून ३२० जण पोर्ट सुदानला आहेत. भारतीयांना खार्तुमपासून पोर्ट सुदानपर्यंत बसने आणले जात आहे.



बचतकार्यात उद्‍भवणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करताना क्वात्रा यांनी बससाठी डिझेलचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले. पश्‍चिम आशियातील भारताचा धोरणात्मक भागीदार म्हणून पुढे येत असलेल्या सौदी अरेबियाने केलेल्या मदतीबद्दल क्वात्रा यांनी आभार मानले.सुदानमध्ये अंतर्गत संघर्षामुळे भारतीय नागरिक स्वदेशी परतत आहेत. भारत सरकारच्या विशेष विमानांनी बुधवारी (ता.२६) रात्री ३६० भारतीय नागरिक दिल्लीत दाखल झाले असून, यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील तीन नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एसवी-३६२० हे पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरूप स्वगृही पोचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिक व विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यांतील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरूप पोचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने