दलित म्हणून जन्माला आल्यानेच हिताचे काम होत नसतं; जेडीयूचं मायवतींना प्रत्युत्तर

पाटणा : बिहारबरोबरच यूपीतही बिहारचे बाहुबली आणि माजी खासदार आनंद मोहन यांच्यावरून राजकारण तापले आहे. किंबहुना अलीकडेच काही कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यातून आनंद मोहन यांची सुटका होऊ शकते, असे बोलले जात आहे. यावरून बसप प्रमुख मायावती यांनीही नितीश कुमारांवर (२३ एप्रिल) हल्ला चढवला होता. त्याला जनता दल युनायटेडकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.नितीश सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी मायावतींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, बिहारमध्ये २००७ साली दलितांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली होती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे बजेट केवळ ४० कोटी रुपये होते, ते २०२३ मध्ये वाढून १,८०५.५० कोटी रुपये झाले.



मायावतींना उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, केवळ दलित म्हणून जन्म घेऊन दलितांच्या हिताचे काम करता येत नाही. महात्मा गांधी दलित नव्हते, पण दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. नितीश कुमार यांनी १८ वर्षांत दलितांसाठी अतुलनीय काम केले आहे. राज्यातील दलित वर्गाला ते चांगलेच माहित आहे.महबूबनगर, आंध्र प्रदेश (आता तेलंगणा) येथील गरीब दलित समाजातील अत्यंत प्रामाणिक अशा जी. कृष्णय्या यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील आनंद मोहनला सोडवण्यासाठी नितीश कुमार सरकारने नियम बदलले आहे. यावरून देशभरात नितीश कुमार दलितविरोधी असल्याचं स्पष्ट झाल्याचं ट्विट मायावती यांनी केलं.आनंद मोहन बिहारमधील अनेक सरकारांची अडचण ठरलेला आहे, पण गोपाळगंजचे तत्कालीन डीएम श्रीकृष्णय्या यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात नितीश सरकारच्या या दलितविरोधी आणि गुन्हेगारी समर्थक कृतीमुळे देशभरातील दलित समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. बिहार सरकारने याचा पुनर्विचार करायला हवा, असंही मायावती म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने