‘मेन राजाराम’ला विशेष ग्रँट देणार!

कोल्हापूर : ‘राज्यातील काही शाळांना ७५ वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. या शाळांमधून अनेक महनीय व्यक्ती शिकल्या. अशा शाळांना राज्य सरकार एक विशेष ग्रँट देणार आहे. तसेच, तेथे कौशल्य विकासासाठीचे उपक्रम राबविण्यासाठीही निधी दिला जाईल.या ग्रँटच्या योजनेत येथील मेन राजाराम हायस्कूलचा समावेश करणार आहोत,’ असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. शासकीय विश्रामगृहातील बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या वेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, की मेन राजाराम हायस्कूल ही शहरातील जुनी शाळा आहे. या वास्तूला परंपरा आहे. अशाच प्रकारच्या ७५ वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झालेल्या काही शाळा राज्यात आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्ती या शाळांमधून शिकल्या आहेत.अशा शाळांसाठी विशेष ग्रँट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या शाळांमध्ये कौशल्य विकास करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शाळांच्या यादीत मेन राजाराम हायस्कूलचा समावेश आहे.



शहरातील प्रश्नांबद्दल ते म्हणाले, ‘शहर आणि जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अंबाबाई मंदिराच्या परिसरात भाविकांना अत्याधुनिक बायोटॉलेल्ट (स्वच्छतागृहे) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे केंद्रही येथे उभारले जाईल.नजीकच्या काळात भाविकांसाठी भव्य भक्तनिवास उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंचगंगा घाट, रंकाळा, जुना शिवाजी पूल यांच्या सुशोभिकरणाला लवकरच सुरुवात होईल. शाहू मिल विकासाच्या कामाचाही आराखडा ठरला जाणार आहे. शहरातील तालमींना निधी उपलब्ध करून देऊन त्यांचा कायापालट केला जाणार आहे.

खासबाग मैदानावर हिरवळ लावणार

या वेळी केसरकर म्हणाले, की खासबाग कुस्ती मैदान हे कोल्हापूरचे वैभव आहे. येथे कुस्ती पाहण्यासाठी येणाऱ्या कुस्ती शौकिनांना मातीत बसावे लागते. आता खासबाग मैदानात लॉन लावण्यात येणार आहे. अशा प्रकारे या मैदानाचे संवर्धन करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने