नको बिडी-सिगारेटचा धूर, हवे ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’

 कोल्हापूर : दुसऱ्यांवर थुंकी उडेल, थुंकीच्या माध्यमातून रोगराई, जीवजंतू, संसर्गजन्य आजार होतील, हे माहिती असूनही लोकं कुठेही थुंकतात. शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदीचा निर्णय घेतला; पण बिडी-सिगारेट कोठेही फुंकणे सुरू आहे.महापालिका, वाहतूक पोलिस विभाग, पोलिस विभागाचेही दुर्लक्ष झालेले दिसते. तंबाखू-मावा खाऊन थुंकणे तर नित्याचेच आहे. हे कायदे केवळ कागदावरच राहिलेले आहेत. संबंधित व्यक्तीकडून दंड वसूल करता येतो. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाला कारवाईचे अधिकार आहेत; पण कारवाई कमी असल्याचे चित्र आहे.

झुरका ओढायचा, मग चहा प्यायचा

पानपट्टी, चहा/कॉफीच्या गाड्यांवर सिगारेट ओढत चहा घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिगारेटचा झुरका ओढायचा, मग चहा प्यायचा. चहा घेऊन झाला की, तिथेच थुंकायचे. सिगारेटचे थोटूक तिथेच टाकायचे.



शहरातील स्थिती

शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर कलम सातनुसार प्रतिबंध आहे. कलम सहा ‘ब’नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायद्यानुसार चलन पावती दंड किंवा बाल कायदा २०१५ नुसार एक लाख रुपये, तसेच सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

शहरातील सर्वाधिक थुंकण्याच्या जागा

  • भाजी मंडई, चहा/नाष्ट्याच्या गाड्या, खाऊ गल्ली

  • शासकीय-निमशासकीय कार्यालये

  • सार्वजनिक स्वच्छतागृहे

  • शासकीय-खासगी रुग्णालये

  • मुख्य बस स्थानक परिसर

  • पानभवन, मल्टिप्लेक्स‌

  • सर्व सांस्कृतिक हॉल्स

  • कृषी उत्पन्न बाजार समिती

  • मॉल्स‌, बेकरीज, किराणा माल

  • धान्य-कडधान्यांची दुकाने

  • औषध विक्री केंद्रे

  • शाळा-महाविद्यालयांबाहेर

  • प्रार्थनास्थळे

  • फूल विक्री, मटण/ फिश मार्केट

  • सर्व रस्ते.

खरे तर सतत थुंकत राहणे, हा एक मानसिक आजार आहे. मनुष्य थुंकतो, तेव्हा अनेक घातक संसर्गजन्य आजार हवेत पसरतात. यासाठी आम्ही अडीच वर्षांपूर्वी ‘थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ’ उभी केली. लोकांना कोठेही थुंकू नका, म्हणून प्रबोधन करतो. काही लोक ऐकतात. काही लोक मात्र थुंकण्याचा वसा सोडत नाहीत. कायद्याचा धाक कुणावरही नाही, हे वास्तव आहे.

-दीपा शिपूरकर, पर्वतक, थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ.

अनेक ठिकाणी थुंकणे, सिगारेट ओढण्याची कारवाई करायला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कमी मनुष्यबळ आहे, तरीही जिथे कोठे असे प्रकार घडत असतात, त्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवतो.

-डॉ. विजय पाटील, महापालिका आरोग्य विभाग

तंबाखू, मावा, सिगारेट विक्री फक्त पानपट्टीवरूनही होते, असे नाही, तर किराणा माल, जनरल प्रोव्हिजन्स‌, चहागाडे/खाद्यपदार्थ गाड्या, छोट्या बेकऱ्यांमधूनही या वस्तूंची विक्री होते. नुसते पानपट्टीधारकांना टार्गेट करणे चुकीचे आहे. तंबाखू, सिगारेटमधून शासनाला महसूल मिळतो. सिगारेटनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने