राफेल नदाल दुखापतीमुळे फ्रेंच ओपनला मुकणार?

नवी दिल्ली : लाल मातीचा बादशहा म्हणून जगप्रसिद्ध असलेला स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल दुखापतीमुळे फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेला सुरुवात होत असून, या स्पर्धेमधून नदालने माघार घेतली आहे. याच कारणामुळे नदाल आता फ्रेंच ओपन स्पर्धेपर्यंत तरी तंदुरुस्त होईल का, या प्रश्‍नाच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.राफेल नदालला पाठीमागे दुखापत झाली आहे. यामधून तो पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे इंडियन वेल्स व मियामी या दोन्ही स्पर्धेतून त्याने माघार घेतली होती. मोंटे कार्लो ही स्पर्धा त्याने याआधी ११ वेळा जिंकली आहे. तसेच ही स्पर्धा फ्रेंच ओपन स्पर्धेआधीची सराव स्पर्धा म्हणून ओळखली जाते.



राफेल नदाल व फ्रेंच ओपन हे समीकरण सर्वश्रुत आहे. फ्रेंच ओपनमध्ये लाल मातीच्या कोर्टवर लढती होतात. येथे नदालचे साम्राज्य कायम राहिले आहे. नदाल याने सर्वाधिक १४ वेळा ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे. सध्या नदाल व नोवाक जोकोविच यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघांनी आतापर्यंत सर्वाधिक २२ ग्रॅंडस्लॅम जेतेपदे पटकाविली आहेत. आता नदालकडे हक्काचे फ्रेंच ओपन जिंकून जोकोविचच्या पुढे जाण्याची संधी असणार आहे.अल्काराझही खेळणार नाही राफेल नदाल याच्यासह कार्लोस अल्काराझ यानेही शारीरिक तंदुरुस्तीअभावी मोंटे कार्लो या स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबाबत त्याने ट्विटरवर माहिती दिली आहे. अल्काराझ याच्यासह फेलिक्स एलियासिम यानेही पायाला झालेल्या दुखापतीमुळे विश्रांती घेतली आहे.मोंटे कार्लो ही माझी आवडती स्पर्धा आहे; पण मला या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. कारण दुखापतीमधून मी अद्याप पूर्णपणे बरा झालेलो नाही. टेनिसकोर्टवर उतरून दुखापत ओढवून घेण्याची जोखीम मी आता पत्करू शकत नाही. तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. लवकरात लवकर टेनिस कोर्टवर परतायचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने