रिफायनरीच्या शंकाबाबत प्रशासनाशी करा चर्चा

 राजापूर : रिफायनरी हा राष्ट्रीय प्रकल्प असून पर्यावरण, शेती, बागायती, आरोग्य याबाबतचे सर्व नियम अन् निकष पाळून शासन या पकल्पाबाबत निर्णय घेईल. त्यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांच्या या प्रकल्पाबाबत काही शंका असल्यास त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी. त्यांचे निरसन करण्यासाठी प्रशासन सक्षम आहे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिला. स्थानिकांना विश्वासात घेवून सर्वेक्षणाचे काम केले जाईल त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या बैठकीत केले.



तालुक्यातील बारसू, सोलगाव परीसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी माती परिक्षणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध दर्शवित सर्वेक्षणाचे काम बंद पाडले होते. त्यानंतर आता पुन्हा सर्वेक्षणाचे काम हाती घेणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देवेंदर सिंहच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेवेळी प्रकल्प समर्थकांच्या वतीने रविकांत रूमडे, महादेव गोठणकर, सुरज पेडणेकर, इरफान चौगुले, रमेश मांजरेकर आदींनी तालुक्याचा विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा सुविधांसाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे मत मांडले.

तर, आमचा विकासाला विरोध नाही. मात्र अशा रासायनिक प्रकल्पांना आमचा विरोध राहील असे रिफायरी विरोधी समितीचे अमोल बोळे, दीपक जोशी यांनी सांगितले. सर्वेक्षण करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्याची मागणीही त्यांनी केली. सुशांत मराठे यांनी रिफायनरी प्रकल्पातून कोण-कोणते रोजगार मिळणार असा सवाल उपस्थित केला.यावर जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्वेक्षणाचे काम हाती घेताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल. स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांचे प्रकल्पाबाबत काही प्रश्न अथवा शंका असल्यास प्रशासन किंवा एमआयडीसी अधिकारी यांच्याकडे त्या मांडाव्यात असे सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासो पाटील, एमआयडीसीचे अधिकारी वंदना खरमाळे उपस्थित होते.

कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न नको
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पोलिस प्रशासनाला गावातील महिला, शेतकरी यांच्याशी संघर्ष करायचा नाही. मात्र, कोणीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करून भडकाविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने