मुंबई-चेन्नईच्या चहात्यांचे देव पाण्यात! रोहितला पहिल्या विजयाची आशा, वानखेडेवर रंगणार सामना

मुंबई: आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार आहे. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरा गेलेला मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल, तर दुसरीकडे लखनौ सुपर जायंटस्‌ संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आत्मविश्‍वास उंचावलेला चेन्नई सुपरकिंग्सचा संघ हीच लय कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला असेल.

बंगळूरच्या मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, आकाश दीपच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. रोहित शर्मा, इशान किशन व कॅमेरुन ग्रीन यांना पहिल्या लढतीत सूर गवसला नाही. सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमार फॉर्म या लीगच्या पहिल्या लढतीतही कायम राहिला. तिलक वर्मा याने नाबाद ८४ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला बंगळूरविरुद्ध १७१ धावा फटकावता आल्या. मात्र या धावा पुरेशा ठरल्या नाहीत.जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मुंबईचा गोलंदाजी विभागातही कस लागत आहे. जोफ्रा आर्चर पहिल्या लढतीत प्रभावी वाटला नाही. अर्शद खान, जेसन बेहरनडॉर्फ, पियूष चावला, कॅमेरुन ग्रीन व हृतिक शोकिन यांना गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. झाय रिचर्डसनऐवजी संघात रायली मेरेडीथ याची निवड करण्यात आली आहे.



कर्णधाराचा आदेश पाळणार का?

चेन्नईने लखनौविरुद्ध २१७ धावा फटकावल्या होत्या; पण तरीही त्यांना अवघ्या १२ धावांनी विजय मिळवता आला. यामुळे वैतागलेल्या कर्णधार धोनीने गोलंदाजांना तंबी दिली. यापुढे वाईड व नो बॉलच्या रूपात अतिरिक्त धावा दिल्यास तुम्हाला इतर कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळावे लागेल, असे त्याने सांगून टाकले. त्यामुळे उद्या चेन्नईच्या गोलंदाजांची परीक्षा असणार आहे. तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, दीपक चहर यांना वाईड व नो बॉल याची काळजी घ्यावी लागणार आहे. रवींद्र जडेजा, मोईन अली, मिचेल सॅंटनर यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार असेल. दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मगाला याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला सँटनरऐवजी संघात स्थान दिले जाऊ शकते.

इतिहास यजमानांच्या बाजूने

मुंबई - चेन्नई यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकषावर नजर टाकल्यास मुंबईचे पारडे जड असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. दोन संघांमध्ये आतापर्यंत ३४ लढती झालेल्या आहेत. त्यापैकी २० लढतींमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे.

ॠतुराजला रोखण्याचे आव्हान

मुंबईच्या गोलंदाजांसमोर आज चेन्नईचा सलामीचा फलंदाज ॠतुराज गायकवाडला रोखण्याचे आव्हान असणार आहे. पहिल्या दोन्ही लढतींत त्याने दमदार अर्धशतकी खेळी साकारली आहे. डेव्होन कॉनवे यानेही मागील लढतीत छान फलंदाजी केली. शिवम दुबे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांच्यामुळे चेन्नईची मधली फळी आणखी सक्षम दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने