अहिल्याबाईंनी डिझाईन केलेली महेश्वरी साडी आजही फार फेमस

बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमधून नदीच्या घाटावरचे सीन्स मध्यप्रदेशातील इंदूरजवळ असलेल्या महेश्वरच्या घाटावरचे असतात. या घाटावर होळकर साम्राज्याचा अतिशय सुंदर राजवाडा आहे. महेश्वर म्हणजे १८१८ पर्यंतची मराठा होळकर साम्राज्याची मालवा प्रांताची राजधानी. आधी इंदूरला असणारी ही राजधानी १७६५ मध्ये होळकर साम्राज्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरमध्ये स्थापित केली.

तेव्हा तिथल्या हातमागावरील वस्त्रोद्योगाला अवकळा आली होती; पण अहिल्याबाई होळकर यांनी सुरतहून आणि मालवा प्रांतातून काही रेवा समाजाचे विणकर बोलावून त्यांना महेश्वरमध्ये वसवले. देशातील सुती आणि सिल्कचे धागे पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांना तिथल्या विणकरांबरोबर जोडून दिले. शिवाय खुद्द अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः डिझाईन सांगून या विणकरांकडून पहिली नऊवार साडी बनवून घेतली.

राजमाता अहिल्याबाई यांच्या प्रोत्साहनाने मग खूप सुंदर साड्या विणल्या जाऊ लागल्या. तेव्हा पाने, फुले आणि मुळांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगात धागे बुडवून-वाळवून मग ही साडी विणली जात असे. राजघराण्यातील स्त्रिया आणि राजवाड्यात येणाऱ्या अतिथी स्त्रियांची ओटी याच साड्यांनी भरली जात असे. लवकरच ही साडी लोकप्रिय होऊन त्या गावाच्या नावावरून त्या साडीचे ‘महेश्वरी’ असे नाव पडले.




या हलक्याफुलक्या साड्या होळकर साम्राज्यात फक्त सिल्कमध्ये विणल्या जात असत, नंतर ‘कॉटन-महेश्वरी’ आणि कॉटन-सिल्क धागे एकत्र करून ‘गर्भ-रेशमी महेश्वरी’ साड्याही बनू लागल्या. या साड्यांमध्ये तलम सिल्कचा धागा वापरल्यामुळे या साड्यांना सुंदर नैसर्गिक चमक असते. होळकर साम्राज्यात या साड्या नऊ वारमध्ये बनत असत. नंतर त्या सर्रास सहा वारमध्ये बनू लागल्या.

या साड्यांचे काठ कॉन्ट्रास्ट असून त्यात तलम ‘जर’ वापरलेली असते. या साड्या, मध्ये प्लेन किंवा बारीक चौकडीच्या असतात. मध्ये प्लेन असणाऱ्या साड्यांवर अंतरा-अंतरावर सुंदर बुट्टी असते. अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा, आजूबाजूची मंदिरे आणि नर्मदा-परिसरातील निसर्ग यांचा महेश्वरी साडीच्या नक्षीकामात खूप प्रभाव पडलेला दिसून येतो.

त्या राजवाड्याच्या भिंतींवरील नक्षीकामावरून प्रेरित होऊन ‘चमेली का फूल’ नामक साडीवर विणलेली पारंपरिक बुट्टी आणि साडीच्या काठावरची कर्णफुले नर्मदाकाठच्या सौंदर्याची साक्ष देतात. पूर्वी पारंपरिक महेश्वरीचा पदर ठराविक धाटणीचा असे. पदरावर मोठे पट्टे विणलेले असत. आता पदरावर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि अत्यंत आकर्षक रंगसंगतीमध्ये पट्टे विणलेले असतात.

या साडीसाठी बंगळूरहून तलम मलबेरी सिल्कचे धागे आणि कोईमतूरहून सुती धागे मागविले जातात आणि त्या धाग्यांपासून कोणत्याही ऋतूत नेसता येणारी मऊसूत महेश्वरी विणली जाते. सध्या महेश्वरचे विणकर, मागणीनुसार ‘डिझायनर महेश्वरी साड्या’ही बनवू लागले आहेत. या डिझायनर साड्यांमध्ये पारंपरिक महेश्वरीचे ठोकताळे नसले, तरी साडीचा पोत मात्र पारंपरिक महेश्वरीसारखाच तलम असतो.

छायाचित्रात सावनी रवींद्रने नेसलेली ‘डिझायनर महेश्वरी साडी’ आहे. सध्या डिझायनर महेश्वरी साड्यांमध्ये खूप कल्पक प्रयोग होत आहेत. ‘हँडब्लॉक प्रिंटेड महेश्वरी’, ‘टिश्यू महेश्वरी’, ‘बाटिक आणि भगरु प्रिंट महेश्वरी’, ‘गंगा-जमुना महेश्वरी’ वगैरे. या साड्यांमध्ये पारंपरिक महेश्वरीचा लहेजा तसाच ठेवून त्यात साडीच्या इतर कलाप्रकारांचे सुंदर फ्युजन केलेले दिसते. अशा साड्यांना परदेशात खूप मागणी आहे.

अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरमधल्या वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन दिल्यामुळे आता महेश्वरमध्ये घरोघरी मिळून काही हजार हातमाग आहेत. रेवा समाजातील अनेक स्त्रिया हातमागावर काम करून घराला हातभार लावत आहेत. महेश्वरच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून जातांना हातमागाचा येणारा लयबद्ध आवाज महिला सक्षमीकरणाची साक्ष देतो!

सावनीची ‘कॉपी-पेस्ट’ साडी

‘बार्डो’ चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रवींद्रला ‘सर्वोत्तम पार्श्वगायिके’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तिच्या यशाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला. सावनीच्या सुरांची मोहिनी आपल्यावर वारंवार पडत आली आहे; पण खुद्द सावनीवर मोहिनी घालणारी एक गोष्ट आहे- ती म्हणजे साडी. काही महिन्यांपूर्वी, सोनी मराठीवर ‘सिंगिंग स्टार’ हा ‘शो’ करत असताना सावनी त्या ‘शो’च्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात गेली होती.

या कार्यक्रमासाठी सावनीने खास इंदूरहून आणलेल्या सुंदर पिवळ्या रंगाच्या कॉटन महेश्वरी साडीची घडी मोडली होती. परफॉरमन्सपूर्वी सावनी ‘हास्य जत्राच्या’ टीमला भेटायला गेली आणि ती व सावनीची अत्यंत लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार या दोघीजणी कडकडून भेटल्या. सावनीची साडी बघून विशाखाने सावनीला भरभरून कॉम्पलीमेंटस दिल्या, ‘‘अगं, काय सुंदर दिसते आहेस तू! आणि साडी काय अप्रतिम आहे, मला खूपच आवडली साडी.’’

सावनीला लहानपणापासूनच एक आवड आणि सवय आहे, कोणालाही तिच्याकडची एखादी वस्तू खूप आवडली तर सावनी कोणताही विचार न करता त्यांना म्हणते, ‘‘घेऊन टाका ही वस्तू तुम्हाला!’’ सावनीला आवडत्या लोकांना गिफ्ट्स द्यायला खूप आवडतात. आवडती गोष्ट अचानक मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद बघून सावनीला मिळणारी उर्जा आणि समाधान तिच्या स्वरांमधून डोकावते. 

त्यामुळे सावनी विशाखाला म्हणाली, ‘‘अगं, तुला इतकी आवडली आहे ना ही साडी मग घेऊन टाक तुला!’’ त्यावर विशाखा म्हणाली, ‘‘वेडी आहेस का तू ? मी सहजच म्हणाले तुला!’’ दोघींच्या अशा ‘त्याग-पाण्याच्या’ गप्पा चालू असतांनाच ‘टेक’ची वेळ झाली. नेहमीप्रमाणेच सावनीचा परफॉरमन्स अप्रतिम झाला. ‘पॅक-अप’ झालं, सावनीला घाईनं निघायचं होतं, तिनं साडी बदलली आणि विशाखाला शोधलं; पण विशाखाची आणि तिची भेट होऊ शकली नाही. मग सावनीने विशाखाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन गुपचूप ती साडी ठेवून दिली.

थोड्याच वेळात विशाखाचा फोन आला, ‘‘अगं साऊ, तू वेडी आहेस का? मला खूप कसंतरी वाटतं आहे ही साडी ठेऊन घ्यायला!’’ सावनी म्हणाली, ‘‘विशाखाताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे. ही साडी नवीनच आहे, पहिल्यांदाच नेसले होते, नवीन कोरी असल्यामुळे तुला दिली. तुझ्या अभिनय कलेसाठी माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट.’’

शेवटी विशाखानं ते गिफ्ट घेतलं आणि सावनीला पुन्हा एकदा आनंदाची ऊर्जा मिळाली. पुढे एक महिन्यानं सावनी कार्यक्रमासाठी परत इंदूरला गेली. तिथं कार्यक्रम झाल्यावर एअर-पोर्टवर ‘चेक इन’ करून सावनी तिथल्या दुकानांमध्ये सहज फेरफटका मारत होती आणि चमत्कार म्हणजे एका दुकानात सावनीला अगदी तशीच सुंदर पिवळ्या रंगाची महेश्वरी साडी दिसली. 

तोच रंग, तोच पॅटर्न, तोच पोत, तीच ‘copy-paste साडी’! सावनीने झडप घालून ती साडी विकत घेतली आणि विशाखाला मेसेज केला, ‘‘विशाखाताई, तुला आता वाईट वाटायचं बिलकुल कारण नाही. मला अगदी तशीच ‘सेम टू सेम’ साडी मिळाली आहे, लवकरच आपण दोघींनी आपापल्या या सेम-टू-सेम साड्या नेसू आणि एकत्र फोटो काढू!’’ तो योग लवकरच कधीतरी येईल....

सावनी म्हणाली, ‘‘शिद्दत से अगर आप किसीभी चीजको चाहों, तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलानेमें जुड जाती है...!’’...आणि तसंच झालं. सावनीला आवडणाऱ्या साडीसारखीच ‘copy-paste साडी’ परत तिच्याकडे आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने