‘राधानगरी’चा जलसाठा खालावला २.८८ टीएमसी पाणी शिल्लक

कोल्हापूर : तीव्र उन्हाळा आणि धरणातून पाणी नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे राधानगरी धरणाच्या जलसाठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. या परिस्थितीत मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात राधानगरी धरणात ३.५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा तो केवळ २.८८ टीएमसी इतकाच आहे.



जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राधानगरी धरणाची पाणी क्षमता ७ टीएमसी आहे. धरणातून गरजेनुसार वरचेवर पाणी सोडण्यात आल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा २८ टक्के असला, तरी यामध्ये मृतसाठ्याचाही समावेश आहे. त्यामुळे धरणातील सर्व पाणी वापरता येणार नाही. त्यामुळेच सध्या पाण्याचे नियोजन सुरू आहे. राधानगरी धरण कोल्हापूरसाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणीसुद्धा याच धरणातून वापरले जाते. आजवर पाणीबाणी जाणवली नसली, तरी पावसाचे आगमन लांबल्यास परिस्थिती कठिण होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने