आरटीई प्रवेशाला १५ मे पर्यंतअखेरची मुदतवाढ जाहीर

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रिया खूपच धीम्या गतीने सुरू आहे. निवड झालेल्या ९४, ७०० विद्यार्थ्यांपैकी फक्त ५४,००० विद्यार्थ्यांचे प्रवेश मंगळवार पर्यंत निश्चित झाले. त्यामुळे अजूनही तब्बल ४०,००० विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याने त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ शेवटची असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



पुणे जिल्ह्यातही ६,४२४ प्रवेश रखडले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन सोडत ५ एप्रिल रोजी काढण्यात आली. निवड यादीतील बालकांचे प्रवेश ८ मेपर्यंत घ्यायचे होते. मात्र, अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती न झाल्याने शिक्षण विभागाने अंतिम मुदत वाढ दिली आहे.
प्रलंबित प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेवून १५ मे पूर्वी निकाली काढाव्यात, अशा सुचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने