Gold Smuggling: दुबई ते मुंबई, सोन्याची पेस्ट करुन सुरू होती तस्करी; मुंबई विमानतळावरील कर्मचारीही होते सामील

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या तस्करीमध्ये काही प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचारी यांचा समावेश होता. महसूल गुप्तचर संचालनालयाने तब्बल २.१ कोटी रुपयांचं ३.३ किलो सोनं विमानतळावरुन जप्त केलं असून याप्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयित प्रवाशाला डीआरआय अधिकाऱ्यांनी अडवल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. संशयित प्रवाशाकडून सोन्याच्या पेस्ट स्वरूपात ३.३ किलो सोनं जप्त करण्यात आलं.



डीआरआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याच्या तस्करीत सामिल असलेले प्रवासी बँकॉक ते दुबई असा प्रवास करत होते. भारतात उतरल्यानंतर ते सोनं मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पोहोचवत होते.

विमानतळावरील कर्माचारी हे तस्करी केलेलं सोनं विमानतळ मेट्रोजवळ असलेल्या पेट्रोल पंपासह अनेक ठिकाणांवरुन बाहेरुन आत आणत होते. त्यानंतर ते या तस्करीत सामिल असलेल्या विमानतळ येथे काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवत होते. दिल्लीहून मुंबईला येत असताना विमानतळावर एका संशियत व्यक्तीला डीआरआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.


संशयिताची चौकशी करण्यता आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तस्करीत सामिल असणाऱ्या सर्व लोकांची व्यवस्था सांभाळणाऱ्या, सोनं जमा करणाऱ्या आणि या सोन्याच्या तस्करीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या या तस्करीच्या साखळीतील अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी जवळपास २० प्रवासी दररोज बँकॉक ते दुबई प्रवास करत होते. या प्रवाशांना मागील दोन वर्षांपासून दररोज आळी-पाळीने दुबई-बँकॉकला पाठवण्यात येत होतं. त्यानंतर भारतात आल्यानंतर मुंबई विमानतळावरील कर्मचारी त्यांना पुढील कामासाठी मदत करत होते.

विमानतळावरील कर्मचाऱ्यांना या तस्करीत सामील करत, या नवीन पद्धतीचा वापर करून दररोज मोठ्या प्रमाणात सोन्याच्या तस्करीत अनेक लोक सामिल असल्याचं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणात आतापर्यंत ११ लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून भारतात सोन्याच्या अशा बेकायदेशीर तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने