सांगली: ध्वनीवर्धक यंत्रणा, लेसर किरणांना बंदीचा ठराव

 सांगली : गावच्या यात्रेत १३ मंडळांनी एकाचवेळी सुरू केलेल्या ध्वनीवर्धकामुळे गावची शांतता बिघडलीच, पण वृध्द व शारिरीक त्रास झाल्याने ग्रामसभेने एक जून पासून कामेरी गावच्या शिवारात ध्वनीवर्धकावर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याशिवाय गावातील दुकानातून रसायनयुक्त शक्तीवर्धक शीतपेय विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

कामेरी (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा एप्रिल महिन्यात २८ व २९ रोजी होती. यात्रेनिमित्त गावातील १३ मंडळांनी ध्वनीवर्धक यंत्रणा वाजविण्यासाठी आणल्या होत्या. रात्री एकाचवेळी एकाच ठिकाणी आवाजाची मर्यादा पार करून या ध्वनी वर्धक यंत्रणा सुरू राहिल्याने गावातील अनेकांना त्रास झाला. तसेच लेसर किरणांचा डोळ्यावर सातत्याने मारा झाल्याने एका तरूणाच्या डोळ्याला इजा झाली.



या पार्श्‍वभूमीवर सरपंच रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ मे रोजी गावाची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यात्रेत अमर्याद आवाजाच्या ध्वनीवर्धकामुळे अनेक वृध्द नागरिक, महिला यांना छातीत धडधड, मळमळ, उलटी, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. असह्य आवाजाने काहीं वृध्दांचा रक्तदाब वाढल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्याचे समोर आले. यामुळे गावची शांतता बिघडवणार्‍या ध्वनीवर्धक यंत्रणांना यापुढे गावच्या वेशीत बंदी घालण्यावर ग्रामसभेत ठराव करण्यात आला. याशिवाय डोळ्यांना ईजा पोहचविणार्‍या एलईडी लेसर किरणांचा वापर असलेल्या यंत्रणांवरही बंदी घालण्याचा निर्णय या ठरावाद्बारे घेण्यात आला.

यापुढे गावातील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, विवाह समारंभ, गणेशोत्सव, नवरात्र, जयंती उत्सव आदी मिरवणुक आदीमध्ये ध्वनीवर्धक यंत्रणा व एलईडी लेसर किरण यांचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या ठराव शहाजी पाटील यांनी मांडला, तर या ठरावाला अशोक पाटील यांनी अनुमोदर दिले. तसेच गावातील दुकानामधून विक्री करण्यात येत असलेल्या शक्तीवर्धक शीतपेयामुळेही लहान मुलांना त्रास होण्याची शययता लक्षात घेउन अशा शीतपेयावरही बंदी घालण्यात आली आहे. या ग्रामसभेस ग्रामविस्तार अधिकारी आनंद पवार यांच्यासह साहित्यिक दि.बा. पाटील, शहाजी पाटील, एम. के. जाधव, पोपट पैलवान, सुजाता पाटील, वनिता क्षिरसागर आदींसह गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने