महाराष्ट्राच्या कबड्डी संघांची विजयी सलामी, महिला आणि पुरुषांच्या संघानी मैदान मारलं

पुणे : आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर आणि स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कबड्डी संघांनी सोमवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये शानदार विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सलामीच्या सामन्यात तामिळनाडू संघाला धुळ चारली. महाराष्ट्र संघाने ४९-२५ गुणांनी सलामीचा सामना जिंकला. यासह महाराष्ट्र संघाला किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करता आली. विजयाचा हाच कित्ता स्नेहलच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला संघाने गिरवला. महाराष्ट्र संघाने पहिल्याच सामन्यात हिमाचल प्रदेश टीमवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ३२-३१ अशा फरकाने सामन्यात विजय संपादन केला. कबड्डीच्या इव्हेंटला सोमवारपासून सुरुवात झाली.

सलामीला महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयाचे मानकरी ठरले. यासह नवरात्रीच्या पहिल्याच माळेला महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयाची नोंद केली. यामध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाचा रोमहर्षक विजय लक्षवेधी ठरला. टीमने अवघ्या एका गुणाच्या आघाडीवर हिमाचल प्रदेश टीमला धुळ चारली. प्रशिक्षक संजय माेकळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय साकारला.



सोनाली, स्नेहल, रेखाने गाजवला सामना

स्नेहल शिंदेच्या कुशल नेतृत्वासह बोनस स्टार सोनाली शिंगटे, रेखा, अंकिता यांनी आपल्या सर्वोत्तम खेळीतून सलामीचा सामना गाजवला. सोनालीने बोनस गुणांसह सुरेच चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच पकडीमध्ये अंकिता, रेखाची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे शेवटच्या मिनिटांपर्यंत अटीतटीत असलेला हा सामना महाराष्ट्राला आपल्या नावे करता आला. संघाकडून सर्वोत्तम चढाईसह पकडीही झाल्या. तसेच टीमला बोनस गुणांचीही कमाई करता आली. त्यामुळेच हिमाचल प्रदेश टीमचा विजयाचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. महाराष्ट्राला सोनाली, स्नेहलच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवाचा मोठा फायदा झाला.

महाराष्ट्रासमोर आता यजमान गुजरात :

महाराष्ट्र महिला संघाने दणदणीत विजयी सलामीने किताबाच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली. आता महाराष्ट्र महिला संघाचा गटातील दुसरा सामना आज यजमान गुजरात टीमशी होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला विजयाची संधी आहे. कारण, यजमान गुजरातला सलामीला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. बिहारने सलामीला गुजरातवर ३८-१५ ने मात केली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने