रामानंद सागर यांचे 'रामायण' पुन्हा दिसणार TV वर! 'आदिपुरुष'नंतर केलेली प्रेक्षकांनी मागणी

मुंबई: रामानंद सागर यांची प्रसिद्ध टीव्ही मालिका 'रामायण' पुन्हा एकदा चाहत्यांसाठी टीव्हीवर परतणार आहे. शेमारू टीव्हीने घोषित केले आहे की ही पौराणिक मालिका ३ जुलै २०२३ पासून प्रसारित केला जाईल. ८० च्या दशकातील या लोकप्रिय मालिकेत शोमध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी प्रभू श्रीराम आणि सीतामातेची भूमिका साकारली होती. तर अभिनेते सुनील लहिरी यांनी लक्ष्मणची भूमिका केली होती. आजही प्रेक्षकांना रामानंद सागर यांची ही मालिका विशेष आवडते. त्यानंतर टीव्हीवर अनेकदा विविध मालिकांमधून 'रामायण' सादर केले गेले, मात्र या मालिकेने जी छाप प्रेक्षकांवर सोडली होती त्याच्या जवळपासही कोणी पोहचू शकले नाही.



दरम्यान सध्या रामानंद सागर यांच्या 'रामायण'ची तुलना 'आदिपुरुष' या नव्या सिनेमाशी केली जात होती. आदिपुरुषच्या रीलिजनंतर रामायण पुन्हा दाखवण्यात यावे अशी मागणीही झाली. या दरम्यान 'रामायण' मालिका पुन्हा प्रसारित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित 'आदिपुरुष'वर सध्या जोरदार टीका होत आहे. या चित्रपटात राम, सीता, हनुमान आणि रावणाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होतोय. १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे आणि सैफ अली खान यांच्या भूमिका आहेत. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान रामायण मालिकेची एक छोटी क्लिप शेअर करत शेमारू चॅनलने सोशल मीडियावर जाहीर केले की, 'रामायण ही जगप्रसिद्ध पौराणिक मालिका सर्व चाहत्यांसाठी आणि आमच्या दर्शकांसाठी परत आली आहे. ३ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता फक्त तुमच्या आवडत्या चॅनल शेमारू टीव्हीवर पाहा.'

करोना काळातही या मालिकेने केले मनोरंजन

करोना काळात जेव्हा मालिका-चित्रपटांचे शूटिंग बंद होते, तेव्हा 'रामायण' मालिका दूरदर्शनवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आली होती. यावेळीही मालिका बघताना प्रेक्षकांनी तोच उत्साह दाखवला होता, जो ८० च्या दशकात मालिका प्रसारित होताना दिसायचा. करोना काळात 'रामायण' मालिकेला मिळालेला प्रतिसाद खूपच कमाल होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने