आता दिंडी, पालखी सोहळ्यात असणार 'आपला दवाखाना'; 22 पथकं 24 तास राहणार तैनात

सांगली : यंदा आषाढीनिमित्त (Ashadhi Wari 2023) निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या, तसेच पालखी सोहळ्यासाठी आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प जिल्हा परिषद आरोग्य विभागानं केला आहे. यामध्ये आरोग्य तपासणीसह उपचार पुरवण्यात येणार आहेत.

प्रत्येक दिंडीप्रमुखांकडे औषधांचे किट देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्यदूत, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 'आपला दवाखाना' हा फिरता दवाखाना सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.



माने म्हणाले, 'जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी वारीपासून वारकऱ्यांच्या सेवेत उतरत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील अन्य कर्मचारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वारीत टँकरमधील पाण्याचीही वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे.'

कशी असेल आरोग्य सुविधा..?

  • पालखीमार्गावर किमान पाच किलोमीटरवर एक आरोग्य पथक औषध साठ्यासह तैनात.

  • दुचाकीवरून दोन कर्मचाऱ्यांची (आरोग्यदूत) २२ पथके कार्यरत असणार. ही पथके २४ तास कार्यरत राहणार.

  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी तांत्रिक कार्यवाही करणार.

  • कीटकजन्य आजार होऊ नयेत, याचीही दक्षता घेतली जाणार.

  • चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षण दिले जाणार.

  • रुग्णवाहिकेत डॉक्टर, आरोग्य सेविका, औषधांसह फिरते दवाखाने मुक्कामाच्या ठिकाणी मिळणार

औषधांचे किट...

आरोग्य विभागाने अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप आदी किरकोळ आजारांवरील औषधे असणारे एक किट तयार केले आहे. हे किट दिंडीप्रमुखांकडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी औषधे लागली तर वारकऱ्यांना ती तातडीने मिळू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने