पाले भाज्यांची आवक घटली; डाळी, कडधान्यांचे दर तेजीत

किल्लेधारूर : आठवडी बाजारात टोमॅटो, शेवग्याची शेंग, बटाटा, ओल्या भुईमुगाच्या शेंगांची आवक वाढली आहे. असे असले तरी फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ झाली. मात्र, टोमॅटोची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. टोमॅटो दहा-पंधरा रुपये किलोने विकले जात आहेत तर दुसरीकडे हिरवी व शिमला मिरचीची आवक घटल्याने भावात तेजी आली असून एक किलोसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत.

डाळी आणि कडधान्यांच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांचे दर तेजीत आहेत. तूरडाळ आता १२०-१५० तर उडीद डाळ ११०-१३० रुपये किलोने विकली जात आहे. मसूर डाळ, हरभरा डाळीच्या दरात वाढ नाही. परंतु, वाटाणा, मूग, मसूर, मटकी यांच्या दरात किलोमागे किमान पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापारी सचिन गुंडेवार यांनी सांगितले. तांदूळ, गहू, ज्वारी, गूळ, साखर, मसाल्याचे दर स्थिर आहेत.




पावसाचा परिणाम गत हंगामात तुरीचे घटलेले उत्पादन, मार्च, एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जानेवारीपर्यंत तूरडाळीचे दर ११० रुपयांपर्यंत होते. एप्रिलपासून ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या स्थानिक बाजारात तूरडाळीचे दर दीडशे रुपयांपर्यंत पोचले आहेत. नवीन माल येईपर्यंत हे दर चढेच राहतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. पाऊस सुरू होऊन पेरण्या वेळेत झाल्या तर डाळींचे भाव उतरतील. सध्या तरी ऑक्टोबरपर्यंत दर तेजीत राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

खाद्यतेलाच्या दरात घसरण

खाद्यतेलाच्या दरात थोडी घसरण झाली आहे. शेंगतेल १७०-१७५, सूर्यफूल १९५, सोयाबीन ११०, पाम तेल १०० रुपये किलो असे दर आहेत. फळबाजारात आंब्यांची आवक टिकून असली तरी त्यांना मागणी घटली आहे. १०० ते १४० रुपये किलो असे दर आहेत.चिकू, सफरचंदची आवक काही प्रमाणात घटली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने