आहारवेद: आरोग्यदायी आले / सुंठ

मसालेदार पदार्थांबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही आल्याचा वापर केला जातो. मराठीमध्ये ‘आले’, हिंदीमध्ये ‘अद्रक’, संस्कृतमध्ये ‘आर्द्रक’ किंवा ‘शृंगबेरा’, इंग्रजीमध्ये ‘जिंजर’, तर शास्त्रीय शाषेत ‘झिंजिबर ऑफिसिनेल’ या नावाने ओळखले जाणारे आले ‘झिंजिबरेसी’ कुळातील आहे.

भारतामध्ये आल्याची सर्वत्र लागवड केली जाते. आल्याच्या गाठी रोपून त्याची लागवड केली जाते. उष्ण प्रदेश व पाणी साचून राहणाऱ्या रेताड जमिनीत आल्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात, तर गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात आल्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. याचे रोप दीड ते दोन फूट उंच असते. त्याची पाने लहान वेलचीच्या पानांसारखी असतात. रोप जसजसे वाढू लागते, तसतशी त्याची मुळे जमिनीत पसरतात. या मुळाच्या कंदालाच ‘आले’ असे म्हणतात.




आले सुकवून त्यांची ‘सुंठ’ बनविली जाते. सुंठ तयार करण्यासाठी आल्याच्या गड्ड्यांना चिकटलेल्या मुळ्यातील माती आणि गड्ड्यांवरील साल काढून टाकावी लागते. यासाठी आले बराच वेळ पाण्यात भिजत ठेवून, धुऊन साफ करावे लागते. आल्याची साल खरवडून काढली जाते. त्यानंतर ते ८ ते ९ दिवस उन्हात वाळवून त्यापासून सुंठ तयार केली जाते. आले व सुंठेचे गुणधर्म साधारणतः सारखेच असतात. फक्त सुंठेपेक्षा आले अधिक सौम्य असते.

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार: आले जड, तीक्ष्ण, उष्ण, अग्निप्रदीपक, उत्तेजक व वायुनाशक आहे. रसाने व पाकाने शीतल, मधुर, तिखट व हृदयास हितावह आहे.

आधुनिक शास्त्रानुसार: आले, सुंठ हे मसाल्यातील पदार्थ असून त्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.

उपयोग

१. आल्याचा मुरांबा, अवलेह, पाक व लोणचे बनविता येते. आल्यात मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून लोणचे बनविता येते. तोंडास रुची नसणे, भूक कमी लागणे, पोटात गॅस धरणे. अशा अनेक विकारांवर लहान मुले, तरुण मुले, गर्भवती स्त्रिया, बाळंतीण स्त्रिया, वृद्धावस्थेतील व्यक्ती आरोग्य चांगले राखण्यासाठी आल्यापासून बनविलेल्या पदार्थांचा निर्भयतेने वापर करू शकतात.

२. सर्दी होऊन तीव्र डोकेदुखी जाणवत असेल तर आले, तुळस, पुदिना, गवती चहा एकत्र करून नैसर्गिक चहा बनवून प्यायल्यास डोकेदुखी नाहीशी होते.

३. आल्याचा रस, लिंबूरस आणि सैंधव एकत्र करून जेवणाच्या सुरुवातीस घेतल्यास मुखशुद्धी होऊन अग्नीप्रदीप्त होऊन भूक चांगली लागते.

४. आल्याच्या रसात मध घालून प्यायल्याने खोकल्यात, श्वासविकारात फायदा दिसून येतो.

५. थंडीतापामध्ये आल्याचा आणि पुदिन्याच्या काढा करून प्यायल्यास घाम येऊन ताप उतरतो.

६. लघवीला वारंवार जाऊन उष्णतेचा त्रास जाणवत असेल, तर आल्याचा रस व खडीसाखर एकत्र करून पाण्यात मिसळावे व ते पाणी एक-एक कप याप्रमाणे दिवसातून तीन वेळा प्यावे.

७. अर्धशिशीचा त्रास जाणवत असेल, तर आले बारीक करून त्याचा कल्क कपाळावर लावावा.

८. मुखशुद्धीसाठी लिंबाचा रस आणि मिठाबरोबर आले सेवन करावे.

९. हृदयरोग असणाऱ्या रुग्णांनी रक्तवाहिनीतील अडथळे दूर होऊन हृदय कार्यक्षम होण्यासाठी आल्याचा रस व तुळशीचा रस एकत्र करून त्यामध्ये पाणी सम प्रमाणात मिसळून ते पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे.

१०. शरीरातील अतिरिक्त चरबी हटविण्यासाठी व सुडौल बांधा राखण्यासाठी आलेरस, आवळारस, तुळस, पुदिना, जिरे यांचे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी दिवसभर प्याले असता अतिरिक्त चरबी कमी होते.

११. गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटी, मळमळ यांचा त्रास होतो. अशा वेळी पाण्यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर व आलेरस एकत्र करून ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्याल्यास तोंडास रुची उत्पन्न होऊन मळमळीची भावना कमी होते.

१२. उदरवात, अग्निमांद्य, आमवृद्धी नाहीशी करण्यासाठी, तसेच तोंडास रुची उत्पन्न करण्यासाठी, भूक वाढविण्यासाठी आल्याचा पाक घेणे फायदेशीर ठरते. आलेपाक तयार करण्यासाठी ताज्या आल्याचा रस काढावा. रसामध्ये थोडे पाणी, साखर घालून त्याचा पाक तयार करावा. पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये वेलची, केसर, लवंग, जायफळ, जायपत्री घालून हे संपूर्ण मिश्रण चिनीमातीच्या बरणीत भरून ठेवावे. हा पाक वर्षानुवर्षे चांगल्या अवस्थेत राहतो. या पाकाचा आवश्यक असेल त्या वेळी वापर करावा.

१३. कावीळ झालेल्या रुग्णाला सुंठ आणि गूळ एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ दिल्यास कावीळ बरी होते.

१४. मूळव्याध झालेल्या रुग्णांनी सुंठेचे चूर्ण ताकात घालून प्याल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

१५. सौंदर्य वाढविण्यासाठी सुंठ बहुगुणी आहे. रोज सुंठेचा काढा घेतल्यास त्वचेचा रंग उजळतो. चेहरा टवटवीत होतो. शरीर सुदृढ बनते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, फोड, नाहीसे होतात व मनदेखील प्रसन्न राहते. काहींना वारंवार ॲलर्जिक सर्दीचा त्रास होतो. अशा रुग्णांनी रोज सुंठ टाकून उकळलेले पाणी प्यावे किंवा गृहिणीने रोज पाण्याच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकावी.

१६. जीर्ण ज्वर झालेल्या रुग्णांनी ताकामधून सुंठचूर्ण सलग तीन आठवडे घेतल्यास जीर्ण ज्वर निघून जातो.

१७. संधिवात आणि अपचनाचे विकार दूर करण्यासाठी सुंठ व गोखरू सम प्रमाणात घेऊन त्याचा काढा तयार करावा. हा सुंठेचा काढा अपचन दूर करून संधिवात हा आजार बरा करतो.

१८. लहान मुलांना वारंवार जंत होत असतील, तर ते नष्ट करण्यासाठी सुंठ अणि वावडिंगाचे चूर्ण मधामध्ये एकत्र करून चाटण द्यावे.

१९. वारंवार जुलाब होत असतील, तर ते बंद करण्यासाठी सुंठ आणि वाळा पाण्यात घालून उकळावे व ते उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर प्यायला दिल्यास जुलाब होणे बंद होते.

२०. वारंवार पोटात मुरडा येऊन जुलाब होत असतील किंवा संग्रहणी रोग झाला असेल, तर तो नाहीसा करण्यासाठी गाजर वाफवून त्यामध्ये जिरेपूड आणि सुंठपूड घालून खायला दिल्यास संग्रहणी आजार बरा होतो.

सावधानता

आले व सुंठ हे अत्यंत गुणकारी पदार्थ असले, तरी त्याचा वापर हा विवेकानेच करावा. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी सहसा आले व सुंठ टाळलेलीच बरी. तसेच ग्रीष्म (उन्हाळा) व शरद ऋतूत याचा वापर सावधानतेने करावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने