मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढतोय टेक्स्ट नेक सिंड्रोमचा धोका! उपचारांसाठी करा फक्त ५ मिनिटे योगासने, वाचा डॉक्टरांचा सल्ला

मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा लॅपटॉप आणि इतर उपकरणांच्या सततच्या वापरामुळे अनेकांना खांदेदुखी, मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अशा स्थितीत आपली मान, बोट, मनगट आणि कोपर यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, अशी स्थिती प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. कारण मोबाईल किंवा इतर उपकरणांच्या अतिवापरामुळे तुम्ही हळूहळू टेक्स नेक सिंड्रोमचे बळी ठरत आहात. यावेळी तुम्ही काही योगासने करून आराम मिळवू शकता. पण, त्याआधी टेक्स नेक सिंड्रोम म्हणजे काय ते जाणून घेऊ..

साधारणपणे आपल्या डोक्याचे वजन सुमारे ४.५ किलो असते. जेव्हा आपण डोकं सरळ ठेवतो तेव्हा त्याचा भार समान रीतीने मानेवर पडत असतो. पण, मोबाईलचा वापर करताना आपण पुढे वाकतो, अशावेळी मानेच्या स्नायूंवर डोक्याचा अधिक भार पडतो. यावर काही संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी मानेचे स्नायू कवटीला जोडतात त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रोट्र्यूशन दिसू शकतो आणि जाणवू शकतो. हे कधीकधी वेदनादायकदेखील असते. डॉक्टर या वेदनांना टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतात. या आजारावर योगाभ्यासक कामिनी बोबडे यांनी काही योगाप्रकार सांगितले आहेत.




मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या खांद्यापासून डोक्यापर्यंतचे अनेक स्नायू दुखावतात. अशावेळी तुम्हाला टेक्स नेक सिंड्रोम आहे की नाही तपासण्यासाठी तुम्ही आरशासमोर मान समोर ठेवून उभे रहा आणि तुमचे कान तुमच्या खांद्याशी जुळत आहेत का ते पाहा. जर तुमचे कान थोडे पुढे असतील आणि ते खांद्याशी जुळत नसतील तर तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोमचा धोका असल्याचे समजून जा.

टेक्स्ट नेक सिंड्रोमपासून तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्पी योगासने आहेत. जे फक्त सकाळीच नाही तर तुम्ही काम सुरू असतानाही करू शकता. विशेष म्हणजे खुर्चीत बसूनही तुम्ही हे योगा प्रकार करू शकता. अवघ्या पाच मिनिटांचे हे योगाप्रकार तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोमपासून सुरक्षित करतात.

१) मुष्टिका बंध आसन : आपलं डोकं आणि पाठीचा कणा सरळ ठेवून आरामशीर बसा. आपले हात खांद्याच्या लेव्हलने समोर करा, दीर्घ श्वास घ्या आणि हाताची बोटे रुंद करा. आता श्वास सोडा आणि अंगठा आत वळवून हाताची मूठ करा, हे थोडावेळ असेच राहू द्या. या योगा प्रकारामुळे कीबोर्ड, मोबाईल वापरल्यामुळे बोटांवर येणारा ताण दूर होतो आणि आराम मिळतो. हा योगाचा एक सेट आहे, जो तुम्ही पाच ते दहा सेटमध्ये करा.

२) मुष्टिका नमना आसन : खुर्चीवर सरळ आणि आरामशीर बसा, यानंतर हात खांद्याच्या लेव्हलने समोर करा. यानंतर हाताचे तळवे बाहेरच्या दिशेन ठेवत बोट वरच्या दिशेने करा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तळवे पुढच्या दिशेने थोडे ढकलल्यासारखे करा. आता श्वास सोडा आणि तळवे समोर करून बोट खालच्या दिशेने वळवा. हा एक सेट आहे. अशाप्रकारे तुम्ही पाच ते दहा सेट करा.

३) मणिबंध चक्रासन : आता एका हाताचे तळवे समोरच्या दिशेने करत अंगठा आत धरून मूठ बंद करा. त्यानंतर तुमची मूठ घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा. अशाप्रकारे दुसऱ्या हातानेदेखील हा योगा प्रकार करा, यामुळे मनगटाच्या सांध्यातील ताण कमी करण्यास मदत होईल.

४) केहुनी नमना आसन : खुर्चीत अगदी ताठ बसून हात खांद्याच्या लेव्हलने समोर करा आणि तळवे वरच्या दिशेने करा. यानंतर श्वास घ्या आणि हात कोपराकडे वाकवून बोटं खांद्यावर टेकवा. आता पुन्हा श्वास सोडा आणि हात सरळ करा. हा या योगा प्रकाराचा एक सेट आहे, अशाप्रकारे तुम्ही पाच ते दहा सेट करा, हा व्यायाम प्रकार कोपराच्या सांध्यासाठी चांगला आहे.

५) केहुनी चक्रासन: दोन्ही हात कोपरापासून दुमडून बोटं खांद्यावर टेकवा. आता उजवा कोपरा डाव्याला आणि डावा कोपर उजव्याला जोडा. अशाच स्थितीत दोन्ही हात घड्याळाच्या दिशेने पाच वेळा आणि घड्याळाच्या उलट दिशेने पाच वेळा फिरवा. हात फिरवताना दोन्ही कोपर एकमेकांना येऊन जोडले जातील अशा पद्धतीने फिरवा.

६) स्कंद चक्रासन : खुर्चीत सरळ बसून आपले हात खांद्याच्या बाजूने पसरवा. खांद्यावर हातांची बोटं टेकवा. यानंतर खांद्याचे सांधे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी पाच वेळा फिरवा.

७) ग्रीवा संचलना : सर्वप्रथम एकदम ताठ बसा, यानंतर मान एकदा मागे आणि एकदा पुढे करा, यानंतर एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे अशी पाचवेळा करा. आता तुमचा संपू्र्ण चेहरा उजवीकडे नंतर डावीकडे अशा पद्धतीने पाचवेळा फिरवा. शेवटी डोके पुढे न वाकवता मान फिरवा. यावेळी तुम्ही मान अर्धवर्तुळाकार घड्याळाच्या दिशेने आणि उलट दिशेने पाच वेळा फिरवा. यावेळी तुमचे हात ध्यानाला बसताना ठेवतात तसे ठेवा.

८) ताडासन : आरामशीर पोझमध्ये बसा. बोटांना इंटरलॉक करा आणि हात आपल्या मांडीवर ठेवा. श्वास घ्या आणि इंटरलॉक केलेले हात बाहेरच्या दिशेने वळवा, आता हात डोक्यावर शक्य तेवढे वर करा. डोके मागे वाकवा, जेणेकरून आपण आपल्या पूर्ण ताणलेल्या हातांच्या मागील बाजूस पाहू शकता. यानंतर श्वास सोडताना हळू हळू आपले हात पूर्व स्थितीत आणा. हा एक सेट आहे. अशाप्रकारे तुम्ही पाच सेट करा. हे आसन उभे राहूनही करू शकता.

९) दीर्घ श्वास घ्या : डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची पूर्ण जाणीव ठेवून दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.

तुम्ही सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर हे योगाप्रकार तुम्ही सहज बसल्या बसल्यादेखील करू शकता आणि या आजारापासून स्वत:ला दूर ठेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने