कारला असलेल्या सनरुफचे काय आहेत फायदे-तोटे? नवीन गाडी घेण्यापूर्वी नक्की जाणून घ्या!

आजकाल कित्येक बजेट कारमध्येही सनरुफ हे फीचर देण्यात येतं. ग्राहकांची आवड म्हणून परवडणाऱ्या दरात कंपन्या हे फीचर उपलब्ध करून देतात. मात्र, कारला सनरुफ असणं हे खरंच फायद्याचं असतं का?

तुम्ही जर सनरुफ असणारी कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सनरुफमुळे गाडीला नक्कीच एक स्टायलिश लुक येतो. मात्र, केवळ तेवढंच न पाहता या फीचरचे फायदे अन् तोटे जाणून घेणंही गरजेचं आहे.




सनरुफचे प्रकार

गाड्यांमध्ये दोन प्रकारचे सनरुफ पाहायला मिळतात. सिंगल पेन सनरुफ आणि पॅनारोमिक सनरुफ असे दोन प्रकार आहेत. सिंगल पेन हे अगदी छोटंसं असतं. तर पॅनारोमिक सनरुफ गाडीच्या छताचा मोठा भाग व्यापतं.

सनरुफचे फायदे

मोठी सनरुफ असलेल्या कारमध्ये भरपूर सूर्यप्रकाश येतो. तसंच कार केबिनला अगदी स्टायलिश लुक येतो. सनरुफला टिंट आणि सनब्लाईंड काच असल्यामुळे केबिन कमी गरम होते.

केबिन होते थंड

जेव्हा गाडी उन्हात बराच वेळ उभी असते, तेव्हा बरेच जण गाडीत बसण्यापूर्वी दरवाजे उघडे ठेवतात. गाडी लवकर थंड करण्यासाठी हे केलं जातं. मात्र, यासोबतच सनरुफही उघडल्यास गाडी आणखी वेगाने थंड होते.

इमर्जन्सी एक्झिट

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही गाडीच्या सनरुफचा वापर इमर्जन्सी एक्झिट म्हणून करू शकता. जेव्हा गाडीचे सर्व दरवाजे लॉक असतील, तेव्हा बाहेर पडण्यासाठी याचा फायदा होतो.

ताजी हवा

सनरुफमुळे गाडीमध्ये ताजी हवा येत राहते. तसंच, चांगलं हवामान असताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठीही याचा फायदा होतो.

सनरुफचे तोटे

डोकं बाहेर काढणं

आजकाल लहान मुलं किंवा कित्येक मोठी माणसं देखील सनरुफमधून बाहेर डोकं काढून हवा खाताना दिसतात. कित्येक जण तर केवळ एवढ्यासाठीच सनरुफ असलेली कार घेतात. मात्र, हे बेकायदेशीर आहे आणि यामुळे तुम्हाला दंड होऊ शकतो. सोबतच, असं केल्यामुळे अपघात होण्याचा धोकाही असतो.

स्पीडमध्ये वापरणं तोट्याचं

जेव्हा तुम्ही गाडी अगदी वेगाने चालवत असता, तेव्हा सनरुफ उघडल्यामुळे कारचं मायलेज कमी होतं. सोबतच, विरुद्ध दिशेने येणाऱ्या हवेचा दबाव जर जास्त असेल, तर कारच्या छताचं नुकसान देखील होऊ शकतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने