आता मुंबई लोकल होणार अजून फास्ट; घेतला महत्वाचा निर्णय

रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये येणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा शोध जलदगतीने लावण्यासाठी ओएचई पॅरामीटर मापन गेज उपकरण मध्य रेल्वेने विकसित केले आहे. त्यामुळे ओव्हरहेड वायरची तपासणी आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

मध्य रेल्वेमार्गावर दररोज लोकलच्या १८१० फेऱ्या होतात. साधारण २५० मेल-एक्स्प्रेस धावतात. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग भारतातील सर्वाधिक व्यस्त म्हणून ओळखला जातो. ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी टॉवर वॅगनद्वारे क्रॉसओव्हर आणि टर्नआऊट तपासण्यासाठी पॉवर ब्लॉक उपलब्ध नसल्याने रेल्वेसमोर अनेकदा मोठे आव्हान असते.




त्याची दखल घेत मध्य रेल्वेने आता इनहाऊस ओएचईमध्ये येणारा तांत्रिक बिघाड जलदगतीने शोधण्यासाठी ओएचई पॅरामीटर मापन गेज यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे ओव्हरहेडमध्ये बिघाडाचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

त्यामुळे नियमित ओएचई तपासणी प्रक्रियेची गती वाढेल. ओएचई ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स मिळविण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. ओएचई तपासणीमुळे वायर इंजिनच्या पेंटोग्राफमध्ये अडकणे, ओएचई फेल्युअर इत्यादी प्रकार कमी होतील, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

७० उपकरणांसाठी काम सुरू पॅरामीटर मापन गेज यंत्रणेसाठी लागणारे उपकरण कुर्ला डेपोत तयार करण्यात आले आहे. एक ओएचई मापन गेज यंत्रणा आधीच यशस्वीपणे कार्यरत आहे. पुढील चार ते सहा महिन्यांत अशी ७० उपकरणे तैनात करण्याबाबत मध्य रेल्वेतर्फे सातत्याने काम सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने