'इंडिया' बदलून भारत कसं होणार? देशाचं नाव बदलतं तरी कसं? संयुक्त राष्ट्राने दिली माहिती

G20 शिखर परिषदेच्या डिनर कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिण्यात आल्याने चर्चाना उधाण आले आहे. सरकार देशाच्या नाव इंडिया वरून फक्त भारत करू शकते, अशी चर्चा आहे. या चर्चांदरम्यान, संयुक्त राष्ट्राने एखाद्या देशाचे नाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे हे स्पष्ट केले आहे. आमच्याकडे नाव बदलण्यासाठी अर्ज आल्यावरच नाव बदलले जाते, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.




संयुक्त राष्ट्र संघटनेने दिली माहिती

माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या पश्नांना महासचिव अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी तुर्कीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे तुर्कस्तानच्या बाबतीत तिथल्या सरकारने आम्हाला नाव बदलण्यासाठी औपचारिक अर्ज पाठवला, त्यानंतरच नाव बदलण्यात आले. आमच्याकडे अर्ज आल्यास आम्ही त्यावर विचार करू.

केंद्र सरकार देशाचे नाव 'इंडिया'बदलून फक्त भारत करण्याचा विचार करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मंत्र्यांना भारत नावावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य करणे टाळावे असे अवाहन केले आहे. G20 शिखर परिषदेदरम्यान काय करावे आणि काय करू नये याबद्दल कॅबिनेट मंत्र्यांना माहिती देताना पंतप्रधानांनी याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, G20 शिखर परिषदेदरम्यान त्यांनी राष्ट्रीय राजधानीत राहावे आणि या विशेष कार्यक्रमादरम्यान आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी जेणेकरून शिखर परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.

नवी दिल्लीत जी२० शिखर सम्मेलनाचे आयोजन ९ आणि १० सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. यादरम्यान अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि उच्चपदस्थ अधिकारी दिल्लीत येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने