फ्रान्स-जर्मनीसह पाच देशांचा इस्रायलला पाठिंबा; संयुक्त निवेदन केलं जारी, म्हणाले, “आम्ही सर्वजण…”

मागील तीन-चार दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजुने प्राणघातक हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. तर असंख्य लोक जखमी झाले आहेत. शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर या भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या प्रतिहल्ल्यात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.

या सर्व घडामोडीनंतर अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने संयुक्त निवेदन जारी करत इस्रायला पाठिंबा दिला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो, असं या निवेदनात म्हटलं आहे.



अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो. आमचं हमासच्या दहशतवादी कृत्यांना कोणतंही समर्थन नाही. त्यांची कृती कायदेशीर नाही. त्यामुळे त्यांचा सर्वत्र निषेध केला गेला पाहिजे. दहशतवादाला कधीही समर्थन दिलं जाऊ शकत नाही.”

“अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असून संपूर्ण जग भयभीत झालं आहे. कारण हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून कुटुंबांची हत्या केली. संगीत महोत्सवाचा आनंद घेत असलेल्या २०० हून अधिक तरुणांची कत्तल केली. वृद्ध महिला, मुले आणि संपूर्ण कुटुंबांचं अपहरण केलं, ज्यांना आता ओलीस ठेवलं आहे,” असं व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने