उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास रोज एक कप दही खाणे ठरतेय फायदेशीर; संशोधनातून झाले उघड

बदलती जीवनशैली, वाढता ताण व अपुरी झोप अशा अनेक कारणांमुळे उच्च रक्तदाब ही समस्या निर्माण होत आहे. भारतात तर ही एक सामान्य बाब बनली असून, देशभरात जवळपास १५ टक्के लोक उच्च रक्तदाबाचा सामना करीत आहेत. पण, एका नव्या संशोधनातून असे समोर आलेय की, रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. हाँगकाँगमधील काही संशोधकांनी यासाठी उंदरांवर अभ्यास केला. त्यामुळे या अभ्यासातून नेमके काय समोर आले आणि दह्याने खरोखरच उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नवी दिल्लीच्या साकेतमधील मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे (डायरेक्टर, इंटर्नल मेडिसिन) डॉ. रोमेल टिकू यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

हाँगकाँगच्या संशोधकांनी केलेल्या उंदरांवरील अभ्यासानुसार प्रो-बायोटिक्स किंवा सूक्ष्म जीव जे तुमच्या अन्नामध्ये येतात- विशेषत: Bifidobacterium lactis M8 आणि Lactobacillus Rhamnosus M9 या दोन प्रजाती. चाचण्यांमध्ये या दोन प्रजातींमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत होत असल्याचे समोर आले. हे निष्कर्ष अद्याप मानवावर तपासले गेले नाहीत; पण प्रो-बायोटिक्सबद्दल संशोधक उघडपणे सांगतात की, ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.




प्रो-बायोटिक्स उच्च रक्तदाब कसे नियंत्रित करतात?

प्रो-बायोटिक्स आतड्यांतील मायक्रोबायोमच्या रचनेत सुधारणा घडवून आणतात आणि चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. प्रो-बायोटिक्स सुरक्षित असून, ते आतड्यांचा दाह आणि आतड्यांसंबंधीच्या इतर आजारांना प्रतिबंधित करतात. Systemic inflammation मुळे रक्तदाब आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची गुंतागुंत वाढू शकते. कारण त्यामुळे धमनीचे आवरण पातळ होते. रक्तवाहिन्यांचे अस्तर खराब होऊन, हृदयाला रक्त जलद आणि कठोरपणे पंप करण्यास भाग पाडते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. पण, जर आतड्यांत चांगले जीवाणू मोठ्या प्रमाणात असतील, तर ते systemic inflammation कमी करू शकतात आणि हृदयाला जास्त काम करण्यापासून वाचवू शकतात..

जीवाणूजन्य चयापचयाचा रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे जळजळ आणि एंडोथेलियल डिसफंक्शन होऊ शकते. या सर्वांचा रक्तदाब नियंत्रणावर परिणाम होतो.

प्रो-बायोटिक्सची इतर संरक्षणात्मक कार्ये

आतड्यांच्या मायक्रोबायोटामध्ये संतुलन राखणे, पचनसंस्थेचे कार्य सुधारणे, शरीराचे वजन कमी करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि कोलेस्ट्रॉलवर परिणाम करणाऱ्या पित्ताचे प्रमाण कमी करणे. कमी रक्तदाबाशी (लॉसोनिया आणि पायरोलोबस) संबंधित चांगल्या जीवाणूंची पातळी वाढवणे आणि उच्च रक्तदाब (अॅलिस्टाइप्स व अॅलोप्रेव्होटेलाशी संबंधित खराब जीवाणूंची पातळी कमी करणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचा आतड्यांचा मायक्रोबायोटा निरोगी नसतो, तेव्हा तुमच्या आतड्याच्या अस्तरात भेगा आणि छिद्रे पडू शकतात; ज्याद्वारे विषारी आणि अंशतः पचलेले अन्न बाहेर टाकण्याऐवजी रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे जळजळ होते आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी होते.

सुरू असलेल्या अनेक संशोधनांतून असे समोर आलेय की, आतड्यांतील जीवाणू आणि जळजळ होण्यामधील असंतुलन सामान्य जुनाट आजारांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. २०१४ मध्ये नऊ अभ्यासांमधून असे समोर आलेय की, उच्च रक्तदाबावर प्रो-बायोटिक्सचा प्रभाव दिसून आला. यावेळी असेही आढळले की, सामान्य आणि उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचा समावेश असलेल्या सहभागींचा सिस्टॉलिक (वरचा नंबर) आणि डायस्टोलिक (तळाचा नंबर) रक्तदाब दोन्हींमध्ये माफक घसरण होती. उच्च रक्तदाब (१३०/८० मिमी एचजी किंवा त्याहून अधिक) असलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक घट दिसून आली. ज्या सहभागींनी मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया किंवा अनेक भिन्न स्ट्रेन असलेले अन्न किंवा पूरक पदार्थ खाल्ले, त्यांच्यात सर्वांत जास्त सुधारणा दिसून आली. परंतु, फायदे दिसण्यासाठी आठ आठवडे किंवा त्याहून अधिक कालावधी लागला. अभ्यास दर्शवितो की, प्रो-बायोटिक्स यूटीआयमध्येही मदत करतात.

शरीरास प्रो-बायोटिक्स कसे मिळेल?

अभ्यासात नमूद केलेय की, दही, केफिर (केफिर हे परंपरेने गायीचे दूध किंवा बकरीचे दूध वापरून बनवलेले आंबवलेले पेय आहे) आणि ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रो-बायोटिक्स घटक आढळू शकतात. पण, तुम्ही खात असलेल्या दह्यामध्ये काही चांगले जीवाणू पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे; जेणेकरून ते प्रभावी चयापचय बूस्टर असेल. घरगुती दह्यामध्ये आवश्यक घटक नसतात पण प्रो-बायोटिक दही चांगल्या जीवाणूंनी भरलेले असते. घरगुती दह्यातील चांगले जीवाणू आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचून किती काळ जिवंत राहू शकतात आणि पोटातील रस व पित्त काढून टाकण्यास प्रभावी असतात का, याचे आकलन करणे कठीण आहे. दह्यामध्ये अधिक जिवंत स्ट्रेन असतात.

त्यामुळे प्रो-बायोटिक दहीतुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. कारण- ते प्रथिनांनी समृद्ध आहे; जे कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, रिबोफ्लेविन, फॉस्फरस व मॅग्नेशियमचा मुख्य स्रोत आहे. दह्यामुळे तुम्हाला अधिक वेळ पोट भरल्यासारखेही वाटते आणि ते कॅल्शियम अतिरिक्त कॉर्टिसोल किंवा तणाव संप्रेरक तयार करण्यास प्रतिबंधित करते; ज्यामुळे शरीराचे वजन वाढण्यासही प्रतिबंध होतो. त्यामुळे दही कॉर्टिसोलशी लढण्यास मदत करू शकते. प्रो-बायोटिक दही पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे; ज्यामुळे पेशींमधील अतिरिक्त पाणी बाहेर काढणे सोपे होते आणि ते मूत्राशयापर्यंत सहज पोहोचते. परिणामत: रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे पूरक आहारास प्राधान्य दिले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने