ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पाऊस, आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम

राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतातुर झाला आहे. पुढील दोन दिवस तरी हा पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. आता हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल.




राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असून, आता हिवाळ्यातही पावसाळाच अनुभवावा लागणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येणार असून, कमाल तापमान सरासरी ३३ अंशांपर्यंत राहील. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळणार असून, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मध्यरात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस सुरुच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने