मोबाइलच्या अतिवापरामुळे मानेचे आजार दिवसेंदिवस वाढताहेत; कोणत्या वयोगटात मानेचे आजार जास्त दिसतात?

मोबाइल हा आज माणसाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाइल दिसतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल तिन्हीत्रिकाळ आपण वापरत असतो. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही असं म्हटलं जातं. मोबाइलच्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या सध्या भेडसावत आहेत. अनेक जणांना दिवसरात्र मोबाइल वापरल्यामुळे शरीराची दुखणी वाढली आहेत. मोबाइलचा सर्वात जास्त परिणाम हा मानेवर होतो. मोबाइलच्या अतिवापरामुळे मानेचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि भविष्यात याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात फिजिओथेरेपिस्ट डॉ. वैभवी वाळिम्बे यांनी लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना सविस्तर माहिती दिली.




डॉ. वैभवी वाळिम्बे सांगतात, “मोबाइलचा वापर कोणत्या स्थितीत केला जातो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जास्तीत जास्त लोक फोन हातामध्ये धरून मान वाकवून फोनकडे पाहतात. जशी जशी आपली मान पुढे वाकते, तसे आपल्या डोक्याचं वजन त्या मानेच्या मणक्यावर पडते. जेवढी मान खाली झुकलेली असेल तेवढं हे वजन वाढत जातं. सरळ मान ठेवून आपण बसलो तर मानेच्या मणक्यावर येणारे चेहऱ्याचे आणि डोक्याचे वजन हे कमी असतं. जर खूप वेळ मान खाली करून फोन बघत बसलो तर मणक्यावर येणारे चेहऱ्याचे वजन आणि डोक्याचे वजन वाढते. दुर्दैवाने बरेच लोक त्याच स्थितीत फोन वापरतात. फार कमी लोक आहेत की जे काळजीपूर्वक डोळ्याच्या सरळ दिशेन फोन ठेवून मोबाइल पाहतात. जर खूप वेळ मान खाली करून फोन बघत बसलात, तर मानेच्या मागच्या बाजूचे स्नायू सतत ताणले जातात आणि मानेच्या समोरच्या बाजूचे स्नायू म्हणजेच गळ्याच्या बाजूचे स्नायू कायम संकुचित स्थितीत राहतात. यामुळे मानेच्या ठिकाणी चरबी निर्माण होणे, मान लहान वाटणे इत्यादी समस्या जाणवतात. मागचे स्नायू कायम ताणले गेल्यामुळे मानेवर खूप ताण येतो आणि त्यामुळे मान दुखायला लागते.”

डॉ. वैभवी वाळिम्बे यांनी मानेच्या आजाराचे काही प्रकार सांगितले आहेत ते खालीलप्रमाणे –

मानेच्या दोन मणक्यांमध्ये गादीशी संबंधित आजारांचा एक वर्ग असतो.

दुसरा म्हणजे, मानेच्या गादीमुळे जर एखादी नस दाबली गेली तर हातामध्ये मुंग्या येणे, हात जड होणे, हात सुन्न पडणे हे प्रकार होतात.

तिसरा प्रकार म्हणजे यामध्ये तुमच्या मणक्याशी काहीही संबंध नसतो, पण आजूबाजूचे स्नायू दुखावले गेले तर त्याला नॉन स्पेसिफिक नेक पेन असेही म्हणतात.

टेक्स्ट नेक हा आणखी एक प्रकार आहे, जेव्हा मान खाली वाकवून हातातील मोबाइलकडे तुम्ही पाहाता, तेव्हा मानेवर ताण पडतो आणि डोकेदुखी, मानदुखी, खांदा आणि हात दुखतात. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

हे आजार फक्त मोबाइलच्या वापरामुळे होतात असे नाही, पण मोबाइल हे त्यातलं एक कारण असू शकतं.

इतर अवयवांवर होणारा परिणाम

डॉ. वैभवी वाळिम्बे सांगतात, “शरीराच्या एका भागातील वेदनांचा हळू हळू त्याच्या अवती भोवती असणाऱ्या भागांवर परिणाम होतो. मानेच्या दुखण्यामध्ये पाठीचा वरचा भागसुद्धा या दुखण्यामध्ये समाविष्ट होत जातो आणि वरच्या पाठीचा भार हळू हळू वाढत जातो आणि जे दुखणं मानेपासून सुरू झाले ते हळू हळू खाली उतरत आपल्या पाठीपर्यंत जाते. जे लोक एकाच स्थितीत खूप वेळ बसतात, फक्त मोबाइलसाठी नाही तर लॅपटॉप वापरणारे किंवा जे सातत्याने सिस्टीम समोर बसून काम करतात, त्या लोकांच्या हातामध्येसुद्धा ताकद नसते. वस्तू हातामधून पडणे, मान दुखल्यानंतर आपोआप हाताच्या बोटांमध्येसुद्धा मुंग्या येणे, हात सुन्न पडणे असे प्रकार होऊ शकतात.”

कोणती काळजी घेणे आवश्यक?

डॉ. वाळिम्बे पुढे सांगतात, “मान कधीही एकाच स्थितीत १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नये. १५-२० मिनिटांनंतर स्थिती बदलणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे नियमित व्यायाम करणे, जिममध्ये जाणे, चालणे गरजेचे आहे; त्याचप्रमाणे मानेच्या स्नायूंचे काही विशिष्ट व्यायाम असतात, ते करणेसुद्धा खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे स्थायूंची स्ट्रेंथ वाढते. पाठीच्या वरच्या भागासाठीसुद्धा व्यायाम करणे आवश्यक आहे. आहारामध्ये भरपूर पाणी पिणे, प्रोटिन्स घेणे, बी १२ चे प्रमाण वाढविणे या गोष्टी फायदेशीर असतात, पण १५-२० मिनिटांनंतर मानेची स्थिती बदलणे आणि व्यायाम करणे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

झोपलेल्या अवस्थेत मोबाइल पाहणे हे कितपत चांगले आहे?

डॉ. वाळिम्बे सांगतात, “रात्रीच्या वेळी झोपेच्या एक-दोन तास आधी मोबाइल वापरू नये, पण अत्यावश्यक काम असेल तर झोपून फोन न पाहिलेलाच बरा आहे. कारण यामुळे मानेवर आणि डोळ्यांवर ताण येतो, पण यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मोबाइलच्या निळ्या प्रकाशामुळे झोपेवर होणारा परिणाम जास्त धोकादायक असतो. या गोष्टी सतत होत गेल्या तर त्याचे परिणाम गंभीर दिसायला लागतात. त्यामुळे फोन झोपताना न वापरलेला अधिक चांगला आहे. पण, तुम्हाला फोनवर अत्यावश्यक काम करायचं असेल तर फोन हातात घेऊन डोळ्याच्या सरळ रेषेत ठेवून जे काही काम करायचं आहे ते करावे आणि नंतर फोन बाजूला ठेवून झोपले तर अधिक चांगले. तुम्हाला मनोरंजन म्हणून फोन वापरायचा असेल तर मोबाइलपेक्षा लॅपटॉपवर मनोरंजनाच्या गोष्टी पाहाव्यात. कारण लॅपटॉपचा स्क्रीन खूप मोठा असतो आणि त्यामुळे मानेवर ताण येत नाही. मोबाइल स्टँड्स मिळतात, ज्यामुळे डोळ्याच्या सरळ दिशेत पाहता येते. तंत्रज्ञानाच्या या नवीन पर्यायांचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

कोणत्या वयोगटात मानेचे आजार जास्त दिसतात?

डॉ. सांगतात, “मी माझ्या व्यावसायिक जीवनात सर्वात जास्त मानेचे आजार २० ते ४५ या वयोगटामध्ये बघितले. करोनामध्ये मानेच्या आजाराचे रुग्ण वाढत गेल्याचे आमच्या लक्षात आले. इंजिनिअर्स, विशेषत: ज्यांचे घरून काम करायचे ते आमचे रुग्ण होते.”

“मानदुखीचा त्रास १ ते १० वर्ष वयोगटातील मुलांनासुद्धा जाणवू शकतो. किती वेळ आणि किती सातत्याने हे मूल फोन वापरत आहे, हे यावर अवलंबून आहे. लहान मुलांना जर आता त्रास होत असेल, तर हा त्रास भविष्यात वाढू शकतो”, असे त्या म्हणाल्या.

डॉ. वाळिम्बे बदलत्या तंत्रज्ञानासंदर्भात बोलतात, “मी स्वत: डॉक्टर आहे. माझा ठाम विश्वास आहे की, माफकपणा ही गुरूकिल्ली आहे. पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे किंवा २० वर्षांपूर्वीचं आयुष्य चांगलं होतं असं म्हणणं, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मला असे वाटते की, कुठेतरी आपण यात समन्वय साधला पाहिजे. यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी सहज मिळवता येतील. जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात, विशेषत: इंजिनिअर्स, त्यांना मी सांगते की हे काम करू नका किंवा ब्रेक घ्या. तेव्हा ते सांगतात की, कितीही इच्छा असली तरी आम्ही हे करू शकत नाही. तेव्हा त्यांना मी विचारते की, नवीन तंत्रज्ञानामुळे खूप बदल होताहेत, खूप वेळ बसावे लागते, तुम्ही हे सर्व बदल स्वीकारले, पण त्यानुसार तुम्ही तुमच्या व्यायामात बदल केले का?

शारीरिक हालचालींमध्ये त्यापटीने वाढ केली का?

खरं तर आपण फक्त तंत्रज्ञानाचं ओझं वाढवत आहोत. पण, आपण आपली शारीरिक हालचाल आणि व्यायाम कमी कमी करत आहोत. यात आपण समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. तुम्ही किती आहारी जाताय, यावर हे सर्व अवलंबून आहे.

डॉ. वाळिम्बे सांगतात, “सर्वात आधी कामासाठी आणि काही मर्यादेपर्यंत मनोरंजनासाठी मोबाइल वापरणे हे ठीक आहे, पण वापरत असताना आहारी जाणे योग्य नाही. मोबाइलच्या वापरावर व वेळेवर मर्यादा असणे आणि कसा वापर करतोय, कोणत्या गोष्टीसाठी करतोय हे समजून घेणे गरजेचे आहे.

फिजिओथेरेपिस्ट म्हणून मला आश्चर्य वाटतं, जेव्हा लोक मला विचारतात की आम्ही किती दिवस व्यायाम करायचा? या प्रश्नाला उत्तरच नाही. हा प्रश्न विचारणे म्हणजे असे आहे की, आम्ही किती दिवस जेवायचे? एक डॉक्टर म्हणून मी बघते तेव्हा कळते की, व्यायाम अजूनही हा माणसाच्या आयुष्याचा भाग होत नाही. ज्याप्रमाणे आपण नियमित जेवण करतो, अंघोळ करतो, प्रात: विधी करतो त्याचप्रमाणे आपण नियमित जेव्हा व्यायाम करू, तेव्हा सर्व गोष्टी सोप्या होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने