काळी द्राक्षे खा; हृदयरोग, रक्तदाब ‘या’ आजारांपासून दूर राहा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ फायदे वाचून व्हाल थक्क

बाजारात आपल्याला दोन प्रकारची द्राक्षे पाहायला मिळतात आणि ती म्हणजे हिरवी व काळी. या दोन्ही प्रकारच्या द्राक्षांची चव वेगळी असते. त्यातील काळी द्राक्षे ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे हिरव्या द्राक्षांच्या तुलनेत काळ्या द्राक्षांची किंमतही जास्त असते. आंबट-गोड चवीबरोबरच ही द्राक्षे आरोग्यास आवश्यक पौष्टिक फायदेदेखील देतात.पण काळ्या द्राक्ष खाण्याचे नेमके फायदे काय आहेत या विषयावर उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

१०० ग्रॅम काळ्या द्राक्षांमध्ये किती पौष्टिक घटक असतात?

आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या मते, काळी द्राक्षे खाण्याचा एक वेगळा आनंद असतो. त्याशिवाय ते शरीरास आवश्यक व पौष्टिक घटकांचे पॉवरहाऊसदेखील मानले जाते. काळ्या द्राक्षांमध्ये विविध आरोग्यदायी घटक आहेत; पण ते खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.




१०० ग्रॅम काळ्या द्राक्षांमध्ये कोणते पौष्टिक घटक किती प्रमाणात असतात ते जाणून घेऊ…

१) कॅलरीज : ६९  kcal

२) कार्बोहायड्रेट : १८.१ ग्रॅम

३)फायबर : ०.९ ग्रॅम

४) साखर : १५.५ ग्रॅम

५) प्रोटीन : ०.६ ग्रॅम

६) फॅट्स : ०.२ ग्रॅम

७) व्हिटॅमिन सी

८) व्हिटॅमिन ए

९) व्हिटॅमिन के

१०) व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 व B5)

११) कॅल्शियम

१२) फॉस्फरस

१३) लोह

१४) पोटॅशियम

१५) मॅग्नेशियम

१६) कॉपर

१७) मॅंगनीज

१८) अँटिऑक्सिडंट्स

त्याशिवाय काळ्या द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स व रेझवेराट्रोलसह विविध अँटिऑक्सिडंट्स घटक असतात; जे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

काळी द्राक्षे खाण्याचे ‘हे आहेत आरोग्यदायी फायदे

आहारतज्ज्ञ सिंघवाल यांनी काळी द्राक्षे खाण्याची सांगितलेले आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

१) हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते : काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम अँटीऑक्सिडंट्स, विशेषत: रेझवेराट्रोल असते; जे हृदयासाठी चांगले असते. हे घटक हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

२) पचनक्रिया सुधारते : काळ्या द्राक्षांमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटासंबंधित विकार टाळण्यास मदत होऊ शकते.

३) त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर : काळ्या द्राक्षांतील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात; तसेच कोलेजन निर्मितीला प्रोत्साहन देऊ शकतात. त्याचप्रमाणे त्वचा उजळण्यासही मदत होते.

४) दाहकविरोधी गुणधर्म : काळ्या द्राक्षांमधील काही संयुगांमध्ये दाहकविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ते जळजळ कमी करून, रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

५) रक्तदाब : काळ्या द्राक्षांतील पोटॅशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी मदत करते.

मधुमेहाचे रुग्ण काळी द्राक्षे खाऊ शकतात का?

आहारतज्ज्ञ सिंघवाल यांच्या मते, मधुमेहाचे रुग्ण काळ्या द्राक्षांचे सेवन करू शकतात; परंतु यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन, त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे हे ठरवावे. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करावे की नाही यासाठी त्यांनी आहारतज्ज्ञ किंवा योग्य डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.

गर्भवती महिलांनी काळी द्राक्षे खाणे फायदेशीर आहे का?

आहारतज्ज्ञ सिंघवाल यांच्या मते, काळी द्राक्षे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण- त्यात शरीरास आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स घटक असतात; जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. परंतु, गर्भवती महिलांनीही त्यातील साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन सेवन करावे.

काळी द्राक्षे खाण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

आहारतज्ज्ञ सिंघवाल यांनी काळी द्राक्षे खाण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचा इशारा देऊन सांगितलेल्या काही गोष्टी खालीलप्रमाणे :

१) ॲलर्जी : काही व्यक्तींना काळ्या द्राक्षांची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे संभाव्य ॲलर्जीक प्रतिक्रियांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे.

२) साखरेचे प्रमाण : काळ्या द्राक्षांमधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण सामान्यत: आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मधुमेह आणि नियंत्रित साखरेचे सेवन करणाऱ्यांनी काही बाबींची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या बाबी खालीलप्रमाणे :

३) अतिसेवन : काळ्या द्राक्षांच्या अतिसेवनामुळे पचनाशी संबंधित समस्या उदभवू शकतात. त्यामुळे काळ्या द्राक्षांचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

काळ्या द्राक्षांच्या सेवनाबद्दल काही गैरसमज

१) गैरसमज : काळी द्राक्षे खाल्ल्याने मधुमेह बरा होऊ शकतो?

  • काळी द्राक्षे संतुलित आहाराचा भाग असू शकतात; परंतु त्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असे म्हणता येणार नाही.

२) गैरसमज : काळ्या द्राक्षांच्या सेवनाने कर्करोग टाळता येऊ शकतो किंवा बरा होऊ शकतो?

  • काळ्या द्राक्षांतील अँटिऑक्सिडंट्सचे आरोग्यदायी फायदे असले तरी त्याने कर्करोग टाळणे शक्य नाही किंवा त्यामुळे कर्करोग बरा होऊ शकत नाही. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी नियमित वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने