कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन

कोल्हापूर: केंद्र शासनाने कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकासकामांसाठी  विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. येत्या दहा तारखेला याच नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.




भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावर विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी, या कामांसाठी सातत्याने  पाठपुरावा केला. केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या माध्यमातून, कोल्हापूर विमानतळासाठी भरीव निधी खेचून आणला. त्यातून उजळाईवाडी विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात आली.  त्याशिवाय पुणे, ग्वाल्हेर, जबलपूर, अलिगड, चित्रकुट, आजमगड, मुराबाद आणि आदमपूर या विमानतळावरही टर्मिनल भवन उभारण्यात आले आहे.  तर वाराणसी, कडाप्पा, हुबळी आणि बेळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल भवन उभारण्यासाठी निधी मंजुर झाला आहे. तसेच दिल्ली विमानतळावर टर्मिनल भवन उभारण्यासाठी ४ हजार ६०० कोटी आणि लखनौ विमानतळासाठी २४०० कोटी रूपये मंजुर केले आहेत. काम पूर्ण झालेल्या टर्मिनल भवनचे उद्घाटन आणि नव्या कामांचा शुभारंभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज विशेष पत्र पाठवून, खासदार धनंजय महाडिक यांना या कार्यक्रमासाठी कोल्हापूर विमानतळावर उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आधुनिक आणि सुसज्ज टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा होईल.  शिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. परिणामी लवकरच कोल्हापूरकरांना विमानतळावर नव्या आधुनिक आणि देखण्या इमारतीचा वापर करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने