यंदाचा उन्हाळा किती तीव्र असणार?

हवामान विभागाचा अंदाज काय?

देशात मार्च ते मे या संपूर्ण उन्हाळय़ात कमाल-किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असणार नाही. पण, एप्रिल आणि मे या काळात अपवाद वगळता भारतातील बहुतेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. संपूर्ण भारतात, त्यातही प्रामुख्याने मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही या भागात जास्त राहण्याची शक्यता आहे. हिमालयीन राज्यांत म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, बिहारसह ईशान्य भारतातील मेघालय, अरुणाचल, मिझोराम, मणिपूरलाही तापमान वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटकात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.




उष्णतेच्या झळांचा अंदाज काय?

पश्चिमी विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड वारे फेब्रुवारी महिन्यात खूपच सक्रिय होते. मार्चच्या पहिल्या आठवडय़ातही एक तीव्र थंड वाऱ्याच्या झंझावाताचा विक्षोभ हिमालयात सक्रिय असून तो हिमालयीन रांगांमधून ईशान्य भारताकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात उष्णतेच्या झळांची शक्यता कमी आहे. मार्चअखेरीपासून तापमानात वाढ होण्यासह उष्णतेच्या झळांच्या शक्यतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे. एप्रिल ते मे दरम्यान उष्णतेच्या झळा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात महाराष्ट्रापासून खालील संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात उष्णतेच्या झळांची शक्यता कमी आहे. एप्रिल ते मे दरम्यान उत्तर व मध्य भारतात झळांचे प्रमाण आणि तीव्रता सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात देशात सरासरी २९.९ मिमी पाऊस पडतो, त्यात वाढ होऊन सरासरीच्या ११७ टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

एल-निनोची स्थिती काय राहील?

जगभरातील हवामानावर प्रतिकूल परिणाम करणारी प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती हळूहळू कमकुवत होत आहे. पण, संपूर्ण उन्हाळाभर एल-निनो सक्रिय असेल. जून महिन्यात एल-निनोची स्थिती निष्क्रिय होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागासह जगभरातील हवामानविषयक विविध संस्थांकडून एल-निनो स्थिती हळूहळू निष्क्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण उन्हाळय़ाच्या काळात एल-निनोचा परिणाम म्हणून तापमान वाढीचा सामना करावा लागणार आहे. हिंदू महासागर द्विध्रुविताही (आयओडी) निष्क्रिय होण्याचा अंदाज आहे.

उष्णतेच्या लाटांचा परिणाम काय?

उत्तर भारत, मध्य भारतासह राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाला उष्णतेच्या झळांचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट म्हणजे काही काळासाठी सरासरीपेक्षा उच्च तापमानाचा कालावधी. या उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका भारताच्या उत्तर-पश्चिम भागाला उन्हाळय़ात बसतो. उष्णतेच्या लाटा सामान्यत: मार्च ते जून दरम्यान निर्माण होतात. अपवादात्मक स्थितीत जुलैपर्यंत उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे संबंधित प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकांवर, पिकांवर प्रतिकूल परिणाम होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या निकषांनुसार मैदानी प्रदेशात किमान तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आणि डोंगराळ भागांसाठी किमान तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास आणि ते सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने जास्त असल्यास उष्णतेची लाट आली, असे म्हटले जाते. उष्णतेची लाट जितकी तीव्र तितका विध्वंस जास्त असतो. भारतालाही उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. मानवी आरोग्य, शेतीतील पिके, पशू-पक्षी आणि वनसंपदेलाही उष्णतेच्या लाटांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते.

महाराष्ट्रात उन्हाळय़ात काय स्थिती?

देशाच्या अन्य भागांसारखेच महाराष्ट्रालाही सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागणार आहे. किनारपट्टीसह राज्याच्या सर्वच भागात तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या झळा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाला बसण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील धरणांत पाण्याचा साठा कमी असण्याच्या काळात तापमानात वाढ झाली, उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला तर भाजीपाला, फळपिकांना फटका बसणार आहे. परिणामी भाजीपाल्याच्या महागाईचा सामना करावा लागू शकतो. संभाव्य पाणीटंचाईची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने