“सत्तेत येऊ अन्यथा विरोधी बाकावर, मात्र…” हिमाचल प्रदेश निवडणुकीवर आप पक्षाने भूमिका केली स्पष्ट

हिमाचल प्रदेश: गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. गुजरातमधील निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने उडी घेतल्यामुळे भाजपा आणि काँग्रेसला जास्त मेहनत करावी लागत आहे. आप पक्षाने गुजरातसह हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही उडी घेतली आहे. आप पक्ष येथील सर्व म्हणजेच ६८ जागा लढवत आहे. एक तर आम्ही सत्ता स्थापन करू किंवा विरोधी बाकावर बसू, मात्र कोणाशीही युती करणार नाही, अशी भूमिका येथे आपने घेतली आहे.हिमाचल प्रदेशमधील आप पक्षाचे शिरमूर जिल्ह्यातील राजगड येथील नेते सुजित सिंह ठाकूर यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने चर्चा केली. त्यांनीच हिमाचल प्रदेश निवडणुकीविषयी आप पक्षाच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त येथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेदेखील सभा घेणार आहेत. सोबतच आप पक्षाचे २० स्टार प्रचारक या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत, अशी माहिती सुजित ठाकूर यांनी दिली.

आम्ही सर्वच्या सर्व म्हणजेच ६८ जागा लढत आहोत. सर्वच जागांसाठी आम्ही समान प्रयत्न करत आहोत. आम्हाला फक्त भाजपा आणि काँग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक कठीण करायची नसून सत्तेत येण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता एकतर राज्यात सरकार स्थापन करू, अन्यथा विरोधी बाकावर बसू, असे आम्ही ठरवले आहे. आम्ही एकटे आहोत, असेही सुजित ठाकुर यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने