पूर्वाश्रमीच्या पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, शालीन भानोत म्हणाला “आता वाद झाला तर…”

मुंबई :  टीव्ही अभिनेता शालीन भानोत बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर तो पुन्हा एकादा छोट्या पडद्यावर परतलेला दिसत आहे. शालीनला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते खूश झाले आहेत. पण काही सोशल मीडिया युजर मात्र त्याला बिग बॉसच्या घरात पाहून नाराज झाले आहेत. शालीनची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौरने त्याच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.दलजीत कौर आणि शालीन भानोत यांचं २००९ साली लग्न झालं होतं. काही वर्षांनंतर २०१५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात दलजीत भावूक होऊन तिच्या समस्यांबद्दल बोलताना दिसत आहे. दरम्यान बिग बॉस १६ च्या घरात जाण्याआधी शालीनने एका मुलाखतीत यावर भाष्य केलं होतं. तो वाद पुन्हा सुरू झाल्यास काय करणार हे त्याने यावेळी सांगितलं होतं.

कौटुंबिक हिंसाचाराच्या वादावर नेहमीच मौन बाळगलेला शालीन या मुलाखतीत म्हणाला, “मी या सर्व गोष्टी हॅन्डल करण्याचा कोणताही प्लान बनवलेला नाही. मला माझ्या भूतकाळाबद्दल बोलायचं नाही. हे माझं खासगी आयुष्य आहे. जे काही माझ्या खासगी आयुष्यात काही वर्षांपूर्वी घडलं होतं त्याला आता ८ वर्षं होऊन गेली आहेत. मी त्यावेळीही गप्प होतो आणि आताही हा वाद पुन्हा सुरू झाला तर मी शांत राहणंच पसंत करेन. कारण हे माझ्या कुटुंबाबद्दल आहे.”दरम्यान शालीनच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप करत न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र त्या प्रकरणी त्याला क्लिनचीट मिळाली होती. त्याच्यावरील सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं होतं. आता बिग बॉसच्या घरात शालीनचं नाव अभिनेत्री संबुल तौकीरशी जोडलं जात आहे. टीना दत्ताने याबाबत शालीनला विचारलं असता त्याने असं काही असल्याचं नाकारलं होतं. ती अजून लहान आहे आणि आमच्यात असं काहीच नाही असं यावेळी तो म्हणाला होता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने