५० वर्षांतील सर्वाधिक परतीचा पाऊस

 कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज सायंकाळीही शहरासह जिल्ह्याला झोडपले. गेल्या ५० वर्षांत परतीचा पाऊस एवढा कधीच पडला नव्हता. अगदी कमी वेळेत ढगफुटीसदृश परतीचा पाऊस पडतो आहे. वडणगे येथे आज सायंकाळी तासाभरात तब्बल ६१ तर तुळशी धरणावर सायंकाळी तासाभरात तब्बल ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमध्येही जुलैसारखी स्थिती पाहावयास मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने दणका दिल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे दिवाळी खरेदीवर पाणी फिरले. दुसरीकडे राधानगरी धरणातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ तासांत पाच फुटांनी वाढली तर इचलकरंजी, रुई व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ तासांत पाच फुटांनी वाढली. इचलकरंजी, रुई व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जून ते सप्टेंबर पावसाळा समजला जातो. तसेच सरकार दरबारी जलसिंचन विभागात १ जुलै ते १५ ऑक्टोबर पावसाचा हंगाम मानला जातो. साधारण ऑक्टोबरमध्ये क्वचितच पाऊस होतो. तोही परतीचा असतो. यामध्ये दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ५ ते १५ मिलिमीटर पाऊस होतो; मात्र आज चक्क ढगफुटी सदृश‍ परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून सोडले. आज दुपारी चारपर्यंत एक-दोन मिलिमीटर पावसाची नोंद होती. त्यानंतर पावसाने पर्जन्यमापन केंद्रावर कुंभी धरणावर ७०, गगनबावडा ३८, मांडुकली ५५ अशी नोंदी केल्या.तुळशी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी सव्वापाच वाजता विसर्ग १५० वरून ५०० क्युसेक करण्यात आला. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने तुळशी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

दुपारी चारपर्यंत ऊन होते; मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण होऊन मुसळधार पावसाने दीड-दोन तासांत जनजीवन विस्कळीत केले. गांधीनगर, वडणगे परिसरासह कागल परिसरात पावसाने त्रेधा उडाली. परतीच्या पावसामुळे शहरासह जिल्ह्याला फटका बसला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील परीख पूल आणि राजारामपुरी चौकात पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांना घरी जाताना कसरत करावी लागली. अनेकांना मिळेल त्या ठिकाणी थांबावे लागले. मलकापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे तासाभराने वीजपुरवठा आणि वाहतूक सुरळीत झाली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने