“एखाद्या लग्नात गेलं तरी खोकेवाला….”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत.

नागपुर: राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी आमदार बच्चू कडू यांनी त्यांना समर्थन दिलं होते. त्यावर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू अत्यंत दुखावले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच, त्यांनी रवी राणांना १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देखील दिलं आहे.

बच्चू कडू यांनी बुधवारी ( २६ ऑक्टोंबर ) नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले, “रवी राणा यांची एकट्याची बोलण्याची हिंमत नाही, ते कोणाच्या भरवशावर बोलतात हे तपासलं पाहिजे. राणांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी आमदारांना गुवाहाटीला नेत पैसे दिले, असा प्रश्न उभा राहतो.”“रवी राणांनी केलेल्या खोक्यांच्या आरोपांवर १ नोव्हेंबपर्यंत पुरावे द्यावे, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ. राणांनी केलेल्या आरोपांनंतर सात ते आठ आमदारांचा फोन आला असून, आमच्याही अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. सत्ताबदल झाल्यापासून आम्ही लोकांचे टोमणे ऐकत आहोत. आम्ही ज्या विचारधारेने शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेलो, ते खालच्या माणासपर्यंत पोहचण्यास वेळ लागणार आहे. पण, एखाद्याच्या लग्नात गेलं तरी ‘खोकेवाला आला’, असे बोलतात. त्यावर रवी राणांनी शिक्कामोर्तब केलं आहे. ही आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने