शाहरुख खानच्या ‘पठाण’चा सिक्वेल येणार?, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रंगली चर्चा

 मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटांपैकी ‘पठाण’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. परंतु, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याच्या सिक्वेलची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.बहुचर्चित ‘पठाण’ या अक्शनपट असलेल्या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याची माहिती आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पठाण’ चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा याबद्दल विचार करत आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये नवीन पात्रही दिसणार आहेत. ‘पठाण’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी स्क्रिप्ट तयार करण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर’ चित्रपटाच्या सिक्वेलप्रमाणेच ‘पठाण’च्या पुढच्या भागांचे शूटिंग वेगवेगळ्या देशात करण्यात येणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान ‘पठाण’मध्ये तर शाहरुख ‘टायगर ३’मध्ये कैमिओ करताना दिसणार आहेत. सलमानने चित्रपटातील त्याचं शूटिंग पूर्णही केलं आहे. परंतु, शाहरुखने अद्याप ‘टायगर ३’च्या शूटिंगला सुरुवात केलेली नाही.
शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘पठाण’बरोबर त्याचा ‘जवान’ चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान तीन वर्षांनंतर चित्रपटांची मेजवानी घेऊन येत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झीरो’ चित्रपटात तो दिसला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने