“माझी बायकोही मला एवढं…”, अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांना टोला; म्हणाले, “थोडं चिल करा!”

 दिल्ली:  दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यामधील तणावपूर्ण संबंध हे कायमच दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिले आहेत. नायब राज्यपाल केंद्र सरकारच्या इशाऱ्यांवर काम करत असल्याची टीका मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण कायमच तापलेलं दिसून येतं. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना उद्देशून केलेल्या एका ट्वीटमुळे या वादामध्ये नवा तडका पडल्याचं बोललं जात आहे. यावरून आता दिल्लीतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

दिल्ली सरकारच्या एक्साईज धोरणावरून नायब राज्यपाल सक्सेना आणि दिल्ली सरकार यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. नायब राज्यपालांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मद्यविक्री परवाना देण्याच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका मुख्य सचिवांच्या अहवालात ठेवण्यात आल्यानंतर नायब राज्यपालांनी ही मागणी केली. तसेच, दिल्ली सरकारच्या शाळांच्या बांधकामातही गैरव्यवहार झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता.दुसरीकडे आपनं नायब राज्यपालांवर २०१६मध्ये ते खादी उद्योग विभागाचे मंत्री असताना १४०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप केला आहे.



या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांवरून वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंदीतून केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘नायब राज्यपाल साहेब मला जेवढं रागवतात, तेवढं तर माझी बायकोही मला रागवत नाही. गेल्या सहा महिन्यांमध्ये नायब राज्यपालांनी मला जेवढी प्रेमपत्रं लिहिली आहेत, तेवढी तर आख्ख्या आयुष्यात माझ्या बायकोनं मला लिहिली नाहीत’, असं आपल्या ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, यासोबतच केजरीवाल यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपालाही टोला लगावला आहे. ‘ नायब राज्यपाल साहेब, थोडं चिल करा. तुमच्या सुपर बॉसलाही सांगा की थोडं चिल करा’, असं केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने