मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा, म्हणाले “माझं नाव सोनिया गांधींनी…”

दिल्ली : येत्या १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार शशी थरूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून सुमारे २५ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा मिळणार आहे. तथापि, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत सुचवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या चर्चेवर मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपलं नाव सुचवलं, ही अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी खरगे म्हणाले की, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं नाही. या सर्व अफवा आहेत. सोनिया गांधींनी माझं नाव सुचवलं असं मी कधीही बोललो नाही. गांधी घराण्यातील कोणीही निवडणुकीत भाग घेणार नाही किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे सोनिया गांधींनी स्पष्टपणे सांगितले आहे,” असंही खरगे यांनी मंगळवारी सांगितलं.“काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी आणि माझी बदनामी करण्यासाठी कोणीतरी ही अफवा पसरवली आहे. सोनिया गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या पक्षाच्या निवडणुकीत भाग घेणार नाही आणि कोणत्याही उमेदवाराला समर्थन देणार नाहीत,” असंही खरगे म्हणाले.दरम्यान, रविवारी (९ ऑक्टोबर) खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहे? याबाबतची काही कारणं दिली आहेत. सध्या देशातील स्थिती अतिशय वाईट आहे. ही स्थितीशी आपल्याला लढा द्यायचा आहे, त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मोदी आणि शाह जे राजकारण करत आहेत, तिथे लोकशाहीला अजिबात स्थान नाही. सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था कमकुवत होत आहेत. यांच्याशी लढण्यासाठी माझ्याकडे सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच शिष्टमंडळाच्या शिफारशीनुसार मी निवडणूक लढत आहे, असं खरगे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने