वडिलांच्या पार्थिवाला मुलीने दिला अग्नी; सावित्रीच्या लेकीने ओलांडली चौकट.

मिरज: मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. अनंताच्या प्रवासाला व्यक्ती जात असताना मुलांनेच अग्निसंस्कार करावेत, अशी प्रथा प्रचलित आहे. मात्र, मिरजेमध्ये परदेशी: कायस्थ समाजातील मुलींने आपल्या पित्याला अग्नी देउन परंपराचे जोखंड झुगारून दिले. मुलीच्या या क्रांतीकारक कृतीसाठी समाजानेही मान्यता दिली.मिरज शहरात  परदेशी-कायस्थ समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाातील शामलाल काशीलाल (कायस्थ वय ५५) यांचे सोमवारी ह्दयविकाराने आकस्मिक निधन झाले. वंशाचा कुलदीपक समजला जाणारा मुलगा सिध्दार्थ याचे काही वर्षापुर्वी निधन झाले. तर मुलगी श्‍वेता ही लंडन येथे वास्तव्यास आहे. ती पित्याच्या अंत्यदर्शनासाठी येत असल्याचे समजताच अंत्यविधी ती येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आला. पित्याचे निधन झाल्याची माहिती मिळताच मुलगी श्‍वेता ही बुधवारी मिरजेत आली. पित्याच्या अकाली निधनाचे दु:ख तर होतेच, पण अग्नि कोण देणार कारण मुलगा  मृत्यू पावला असल्याने पर्याय काय ? असा प्रश्‍न नातेवाईक व समाजासमोर पडला. समाजाने बैठक घेउन मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद कशासाठी करायचा, जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढाच मुलीलाही असायलाच हवा या विचारापर्यंत समाजातील जाणकार मंडळी आली. त्यांनी पित्याच्या पार्थिवाला मुलीच्या हातूनच अग्नि देण्यास समाज मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी रात्री मिरजेतील कृष्णाघाट येथील स्मशान भूमीमध्ये मुलगी श्‍वेता हिने पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. मृतिकेचे सर्व विधीही मुलीनेच पूर्ण केले. समाज परिवर्तनाचा क्रांती कारक निर्णय घेण्यासाठी परदेशी-कायस्थ समाजातील संजयलाल परदेशी, नरेंद्र परदेशी, बिंदूलाल परदेशी, गणेश परदेशी, पुरूषोत्तम परदेशी, मुकूंद परदेशी, नंदलाल परदेशी, संतोष कायस्थ, दिपकलाल परदेशी, प्रकाशलाल परदेशी, राजू हजारी, अष्टविनायक कायस्थ यांनी पाठिंबा दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने