दसऱ्याच्या मुहूर्तावर कोट्यवधीची उलाढाल

 सोलापूर : साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने, सोने, कपडे, मिठाई, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तुंची खरेदी जोरात झाली. या निमित्ताने बाजारात करोडोची उलाढाल झाली.

आज (बुधवारी) सकाळपासून बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. दसऱ्याच्या मुहुर्तावर खरेदी करण्यासाठी आधीपासून वाहन बुकींग सुरु झाली होती. बुकिंग करून झाल्यावर आज ग्राहकांनी वाहने शोरूम मधून नेली. सर्वच वाहनांची यावर्षी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. तसेच झिरो किंवा कमीतकमी डाउनपेंमेट, कर्ज योजना, आकर्षक इएमआय या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुचाक्यांच्या बरोबरीने चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेली. यावर्षी ई-व्हेईकल देखील बाजारात आल्या आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे ई-व्हेईकलची विक्री वाढली आहे.सोन्याच्या भावात मागील पंधरवड्यात काही प्रमाणात घसरण होती. पण मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा आकडा गाठला गेला. आज सोन्याचे २४ कॅरेटचे भाव ५१ हजार रुपयांवर पोहोचले. तरीही सोन्याची खरेदी करण्यासाठी सोने-चांदी दुकानात दिवसभर गर्दी होती. अनेक प्रकारचे दागिन्यांची खरेदी करण्यात आली. याशिवाय चांदी, हिरेयुक्त दागिन्यांची खरेदी झाली. मात्र, पावसाने झालेली पिकांची नासाडीने शेतकऱ्यांचा उत्साह खरेदीबाबत कमीच होता. मधला मारुती मंदिर परिसरात झेंडूची फुले, हार, आपट्याची पान व दसरा पुजनाचे साहित्य नागरिकांनी खरेदी केले.ऐन दसऱ्याच्या काही दिवस आधी फाईव्ह-जीची घोषणा झाल्याने फाईव्ह-जी चे मोबाईलची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. अनेक कंपन्यांनी बाजारात फाईव्ह-जीसाठी उपयुक्त ठरणारे मॉडेल आधीपासून बाजारात आणले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी करण्यात आली. याशिवाय दसऱ्याच्या सणांसाठी मिठाईला देखील मागणी होती. श्रीखंड, काजू कतली, गुलाबजाम, जिलेबी यासह अनेक मिठाईची विक्री झाली. मधला मारुती परिसरातील मिठाईच्या दुकानात दिवसभर गर्दी होती. एकंदरीत कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांना निर्बंधमुक्त वातावरणात दसरा सणाची बाजारपेठ फुलली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने