भारत अन्य देशांना ५ जी तंत्रज्ञान देण्यास सज्ज; अमेरिकेत निर्मला सीतारामन यांची ग्वाही.

 नवी दिल्ली : भारतातील ५ जी (5G) तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. भारताच्या ५ जी तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे सीतारामण यांनी अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज’मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

देशात लॉन्च करण्यात आलेले ५ जी तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सीतारामण यांनी सांगितले आहे. “देशातील या तंत्रज्ञानासाठी दक्षिण कोरियातून काही साहित्य येऊ शकतं. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देशाकडून ते येणार नाही. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान असून आगामी काळात ज्यांना ते हवं आहे, त्यांना देता येईल”, असे सीतारामण म्हणाल्या आहेत.१ ऑक्टोबरला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या तारखेची इतिहासात सुवर्णाअक्षरांनी नोंद होणार असल्याचे सांगतानाच ५ जी तंत्रज्ञानामुळे भारताने दूरसंचार क्षेत्रात जागतिक मानकं स्थापित केली आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. भारतात रिलायन्स जीओ आणि एअरटेल या कंपन्याकडून ही सेवा पुरवण्यात येत आहे. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात ५ जी सेवा सुरू करण्याची योजना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने