चलनी नोटांवर आधी गांधीजींचा फोटो नव्हताच; वाचा नेमका काय आहे भारतीय चलनाचा इतिहास! कशा छापल्या जातात नोटा!

 दिल्ली: गेल्या दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली. मुळात केजरीवाल यांनी ही मागणी गांभीर्याने केली नसून मोदी सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावण्यासाठी त्यांनी या मागणीचा वापर केला. मात्र, त्यानंतर भारतीय चलनी नोटांवर गांधीजींऐवजी अजून कुणाकुणाचे फोटो असायला हवेत, याची अहमहमिकाच राजकीय नेतेमंडळींमध्ये लागली. मग देवी-देवतांच्या फोटोंपासून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोपर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नोटांचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. मुळात, गांधीजींचा फोटो चलनी नोटांवर सुरुवातीपासून नव्हताच! मग तिथे काय होतं?नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आला?

खरंतर गेल्या दोन पिढ्यांपासून आपण नोटांवर महात्मा गाधींचाच फोटो पाहात आहोत. गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून हाच फोटो भारतीय चलनी नोटांवर आहे. पण त्याआधी भारतीय नोटांवर कुणाचे किंवा कोणते फोटो होते? २ ऑक्टोबर १९६९ रोजी महात्मा गांधींच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांचा फोटो भारतीय चलनावर अवतरला. तेव्हापासून आजतागायत भारतात छापल्या जाणाऱ्या सर्व नोटांवर गांधीजींचाच फोटो आहे.

१९६९पूर्वी भारतीय नोटांवर काय होतं?

भारतातील सर्व बँकांची शिखर बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १९३५ साली, म्हणजेच ब्रिटिश राजवटीच्या काळात झाली. देशातली पहिली चलनी नोट १९३८ साली छापण्यात आली. विशेष म्हणजे एक रुपयाच्या या पहिल्या नोटेवर किंग्ज जॉर्ज सहावे यांचा फोटो होता.भारत स्वतंत्र झाल्यानंतर आरबीआयनं पहिली नोट १२ ऑगस्ट १९४९ रोजी छापली. या नोटेवर आत्ता गांधीजींचा फोटो आहे, त्या ठिकाणी अशोकस्तंभाचा फोटो होता. ५०च्या दशकात भारतात एक हजार, पाच हजार आणि १० हजार रुपयाच्या नोटा अस्तित्वात होत्या. त्या नोटांवर अनुक्रमे तंजावूरचं मदिर, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि अशोक स्तंभ यांचे फोटो होते. काही चलनी नोटांवर संसद आणि ब्रह्मेश्वर मंदिराचेही फोटो होते.दोन रुपयांच्या नोटेवर थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांचा फोटो होता. पाच रुपयांच्या नोटेवर शेतीकामाशी निगडित साहित्याचा फोटो होता. १० रुपयांच्या नोटेवर मोराचा फोटो होता, तर २० रुपयांच्या फोटोवर रथाच्या चाकाचा फोटो होता.

नोटांचं डिझाईन, फोटो कोण ठरवतं?

एकीकडे नेतेमंडळी फोटो बदलण्याची मागणी करत असताना दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र नोटांचं डिझाईन बदलण्याची पूर्ण प्रक्रियाच बदलण्याची मागणी केली आहे. नोटांचं किंवा नाण्यांचं डिझाईन बदलण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार मिळून घेतात. चलनाच्या नक्षीमध्ये केल्या जाणाऱ्या कोणत्याही बदलासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाची परवानगी घेणं आवश्यक असतं. सर्वात आधी आरबीआयकडून चलनाची डिझाईन तयार केली जाते. त्यानंतर बँकेच्या सेंट्रल बोर्डाच्या मंजुरीसाठी ती पाठवली जाते.सेंट्रल बोर्डाच्या मंजुरीनंतर ही डिझाईन केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली जाते.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने