‘झिंगाट’ गाण्यावर गश्मीर महाजनीसह बेभान होऊन नाचला सिद्धार्थ मल्होत्रा, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

मुंबई :छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ या शोच्या दहाव्या सीझनलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनीही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. नुकत्याच या शोमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने हजेरी लावली.

‘झलक दिखला जा’ शोमधील या भागाचा प्रोमो व्हिडीओ कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या भागात गश्मीरने ‘तुझ्या प्रितीचा हा विंचू’ या ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. अभिनेत्याबरोबरच गश्मीर एक उत्तम डान्सरही आहे. त्याचा डान्स पाहून सिद्धार्थही भारावून गेला. “गश्मीर ब्रो. तू खूप उत्तम डान्सर आहेस”, असं म्हणत सिद्धार्थने गश्मीरचं कौतुकही केलं.


गश्मीरला पाहून सिद्धार्थलाही डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. सिद्धार्थ आणि गश्मीरने ‘सैराट’ चित्रपटातील अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरला. सिद्धार्थ-गश्मीरने झिंगाटच्या हूक स्टेप्स करत अफलातून डान्स केला. याशोमध्ये परीक्षक असलेल्या करण जोहरने त्यांचा डान्स पाहून “झिंगाट पफॉर्मन्स”, अशी प्रतिक्रिया दिली.गश्मीरने ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘बोनस’ या मराठी चित्रपटात काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. मराठीबरोबरच त्याने हिंदी मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने