“बहुतेक हे विधीलिखित होतं…”; केदार शिंदे यांनी अजय-अतुल यांच्यासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत.

मुंबई: लोककलेच्या माध्यमातून चले जाव चळवळीपासून ते हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा कित्येक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत समाजजागर करणाऱ्या शाहीर कृष्णराव साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेबर २०२२ पासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने, शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे. गेले अनेक महिने ते या चित्रपटावर काम करत आहेत. गायक संगीतकार यांची जोडी अजय-अतुल हे या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळत आहेत. अजय-अतुल आणि केदार शिंदे यांचे एक खास नाते आहे. जवळपास १७ वर्षांनी ते एकत्र काम करत आहेत. याच निमित्ताने केदार शिंदे यांनी अजय-अतुल यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांचा अजय-अतुल यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. पण लक्ष वेधून घेतले ते या फोटोच्या कॅप्शनने. हा फोटो पोस्ट करत केदार शिंदे यांनी लिहिले, “महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा संगीतावर अवलंबून आहे. अजय-अतुल यांच्यासोबत १७ वर्षांनंतर काम करण्याचा योग जुळून आला आहे. बहुतेक हे विधीलिखित होतं. पहिला सिनेमा “अगं बाई अरेच्चा” यातलं “मल्हारंवारी” हे गीत शाहीरांनी गाऊन अजरामर केलं. त्यांच्या सिनेमासाठी अजरामर संगीत देण्यासाठी अजय अतुल आणि मी एकत्र आलोय. माझ्या लेकीच्या पहिल्या सिनेमाच्या, पहिल्या वहिल्या गाण्याला सुध्दा त्यांनीच संगीत द्यावं?? उत्सुक आहे पुढे तुमच्यासमोर संगीत आणण्यासाठी!!!”

केदार शिंदे यांची ही पोस्ट खूपच चर्चेत असून या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं. बाई अरेच्चा’ चित्रपटातील अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड गाजली. त्यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात केदार शिंदे आणि अजय-अतुल मिळून त्यांच्या नवीन गाण्यांनी काय जादू करतात हे बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने