''गाळे दाखवा मीच कुलूप ठोकते'' पेडणेकरांचा संताप; चौकशीलाही जाणार नाहीत

मुंबई: वरळीतल्या 'एसआरए'च्या इमारतीमध्ये किशोरी पेडणेकर यांचे अनधिकृत गाळे आणि फ्लॅट असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी काल पेडणेकर यांची चौकशीदेखील झाली. आजही पोलिसांनी त्यांना दादर ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं आहे. परंतु पेडणेकर यांनी चौकशीला जाणार नसल्याची भूमिका घेतलीय.ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरएमधील फ्लॅट आणि गाळे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी आज पत्रकारांना वरळी येथील एसआरए इमारतीच्या परिसरात नेले. 'माझे गाळे दाखवा, मीच कुलूप लावते' अशी भूमिका पेडणेकरांनी घेतली. त्यांनी सोबत कुलूप आणि चाव्या आणल्या होत्या.यावेळी माध्यमांशी बोलतांना पेडणेकर म्हणाल्या की, माझ्या आयुष्याचं पुस्तक मी उघडं ठेवलं आहे. वरळीतल्या या एसआरए इमारतीत माझे गाळे नाहीत. विरोधकांनी माझी बदनामी करु नये. मला इथल्या लोकांमध्ये निवडणूक लढवायची आहे. कुणालाही माझ्या गाळ्यांबद्दल तुम्ही विचारु शकता. मी जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला तेव्हा इथे तात्पुरती राहात होते. २०१९ला मी हे घर सोडलं होतं. याबाबत वस्तुस्थिती कळावी म्हणून मी इथं माध्यमांना बोलावल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.

चौकशीला जाणार नाही- पेडणेकर

कायद्यावर आणि पोलिस यंत्रणेवर माझा विश्वास आहे. परंतु जाणीवपूर्वक कुणी दबावतंत्र चालवत असेल ते मी खपवून घेणार नाही. त्यामुळे आज मी चौकशीला जाणार नाही, अशी ठाम भूमिका किशोरी पेडणेकर यांनी घेतली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला. मागच्या पंधरा दिवसांमध्ये फडणवीसांच्या बोलण्यामध्ये संवेदनशिलता दिसून येत आहे. त्यामुळे एका सामान्य महिलेची होत असलेल्या बदनामीकडे ते लक्ष देतील, असं पेडणेकर म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने