“…तर याही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी

 कोल्हापूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाबरोबरच सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केलं. इतकचं नाही तर कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही असं सांगताना शिंदेंनाही घरी जावं लागेल असं विधान अजित पवारांनी केलं“अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ‘ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत,’ असं ते (मुख्यमंत्री) म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या?” असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे, “काही त्या टीव्हीवाल्यांनी विचारलं कशाला आलात? त्यावर कशाला आलोय कुणाला माहिती. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही असं ते लोक सांगत होते,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने