म्हशींचा डौलदार रोड शो...!

 कोल्हापूर : शिंगांना मोरपिस, पायात चांदी-सोन्याचा तोडा व कवड्यांच्या माळेने सजलेल्या म्हशींनी काल आणि आज हलगी-घुमक्‍याच्या तालात डौलदार रोड शो केला. दरम्यान, शनिवार पेठ गवळी गल्ली, पंचगंगा घाट, कसबा बावडा, वडणगे, पाचगाव आदी परिसरात दूध व्यावसायिकांनी म्हशींच्या सवाद्य मिरवणुका काढल्या. काल दिवाळी पाडव्यादिवशी शनिवार पेठ गवळी गल्लीत, तर आज सागरमाळ येथे झालेल्या या सोहळ्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त गर्दी करत म्हशींप्रती कृतज्ञतेची परंपरा कायम ठेवली.दिवाळी पाडव्याला म्हशींना सजविण्यासाठी येथील गवळी व्यावसायिकांत यंदाही ईर्ष्या राहिली. पंचगंगा घाटावर म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढच होती. मोरपिसांचे तुरे शिंगांना लावून, सजलेल्या म्हशींची पूजा झाली आणि काल दुपारी चारनंतर शहरातील सर्व गवळी व्यावसायिक म्हशींना घेऊन गवळी गल्लीत आले.म्हशींचा रोड शो सुरू झाल्यानंतर विविध संस्था, संघटनांसह सम्राट चौक मित्र मंडळ आणि गवळी गल्ली मित्र मंडळानेही सर्वांचे स्वागत केले. आज सागरमाळावरही याच म्हशींनी सागरदेवाचे पूजन केले. रेड्यांनाही येथे सजवून आणले.त्यांना दोन पायांवर उभे करण्याचे आणि तीन हाकेत बोलावण्याचे गवळी व्यावसायिकांचे कौशल्यही या निमित्ताने सर्वांनाच अनुभवता आले.

दरम्यान, कसबा बावडा येथे आमदार ऋतुराज पाटील यांनीही म्हशी पळवण्याच्या सोहळ्यात मोटारसायकल चालवून सहभाग घेतला. सागरमाळ येथे आज झालेल्या सोहळ्यात सतेज ऊर्फ बंटी पाटीलप्रेमींच्या वतीने सजलेल्या म्हशी, रेडा आणि रेडकांना पारितोषिके देऊन गौरवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने