ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

मुंबई :  प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक, निबंधकार, अभिनेते आणि प्राध्यापक महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहातर्फे आयोजित केला जाणाऱ्या साहित्य महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. महेश एलकुंचवार हे भारतातील सर्वात प्रभावशाली साहित्यिक म्हणून ओळखले जातात. भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.

‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’, ‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’, ‘आत्मकथा’, ‘वासांसि जीर्णानि’, ‘सोनाटा’, ‘एका नटाचा मृत्यू’ ही महेश एलकुंचवार यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांनी आतापर्यंत नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाट्य लेखनातून सादर केलेले आहेत. यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महेश एलकुंचवार यांची नाटकं फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. त्या नाटकांचे भाषांतर भारतीय आणि अनेक पाश्चिमात्य भाषांमध्ये केले जात असे. त्यांची अनेक नाटकं ही इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेतही गाजली.


टाटा समूहातर्फे दरवर्षी साहित्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना दिला जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल बोलताना महेश एलकुंचवार म्हणाले, “मी फार आनंदी आहे की मला टाटा समूहातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जात आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. मला कधीतरी हा पुरस्कार मिळेल याबद्दल मी कल्पनाही केली नव्हती.”“हे फार अनपेक्षित आहे. भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार मिळत आहे हा अतिशय आनंददायी विचार आहे. मला खरोखरच सन्मानित झाल्यासारखं वाटतं आहे” अशा शब्दांत महेश एलकुंचवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने