“माझे मानसिक संतुलन…”; मनोज बाजपेयीने थांबवले होते ‘गली गुलियां’चे शूटिंग, अभिनेत्याने सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई:मनोज बाजपेयीचे नाव मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. तो नेहमी वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करत त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत असतो. बॉलिवूडमधील एक बहुआयामी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. नुकताच त्याचा ‘गली गुलियां’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याची माहिती मनोजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. परंतु ही पोस्ट करताना त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. कारण ही भूमिका साकारताना तो त्याचे मानसिक संतुलन गमावण्याच्या मार्गावर होता, असा खुलासा त्याने केला आहे.बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘गली गुलियां’ हा चित्रपट काल ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे. जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची प्रशंसा झाली. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती देताना मनोज बाजपेयीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. मनोज बाजपेयीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.मनोजने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे त्याचे एक पोस्टर शेअर केले. हे पोस्टर शेअर करताना त्याने या चित्रपटात काम करण्याचा त्याचा अनुभवही सांगितला. त्याने लिहिले, “‘गली गुलियां’ हा चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे. या भूमिकेची तयारी करताना मी माझे मानसिक संतुलन गमावण्याच्या मार्गावर पोहोचलो होतो. प्रकरण इतके वाढले होते की मला शूटिंग थांबवावे लागले. ‘गली गुलियां’ या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक आणि कलाकार म्हणून माझ्या फायद्याची आहे. अखेर हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर आला आहे.”

पुढे त्याने लिहिले, “हा चित्रपट देशातील आणि जगभरातील सर्व चित्रपट महोत्सवात गेला. या चित्रपटाची सर्वत्र खूप प्रशंसा केली गेली. पण हा चित्रपट भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पण आता त्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. आज या चित्रपटाच्या रिलीजची बातमी तुमच्याशी शेअर करताना मी प्रचंड खुश आहे. तुम्हा सर्वांना हा चित्रपट खूप आवडेल याची आशा खात्री आहे.” या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती दिपेश जैन यांची आहे.दरम्यान मनोज बाजपेयी आता ‘सूप’ या नव्या वेबसीरिजमधून वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मनोज यांच्याबरोबर कोंकणा सेन शर्मा, नासर, सयाजी शिंदे असे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने